Headlines

‘जास्तीत जास्त काय होईल? माझा…’, प्रदीप पूर्णेकरांचं शेवटचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत; आधीच लागलेली हल्ल्याची चाहूल? गूढ वाढलं

ठाण्यातील मानपाडा येथील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मंगळवारी रात्री पूर्णेकरांच्या कार्यालयामध्ये शिरुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकरांचा मृत्यू झाला. या प्रकरणामध्ये ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना असा तणाव निर्माण झाला असून माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीनेच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून पोलिसांनी एका महिलेसहीत दोन संशयितांना अटक केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. असं असतानाच दुसरीकडे प्रदीप पूर्णेकरांचं शेवटचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे व्हॉट्सअप स्टेटसमध्ये?

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे शेवटचे व्हॉट्सअप स्टेटस समोर आलं आहे. हेच स्टेटस त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरही पोस्ट केलं होतं. या व्हिडीओ स्टेटसमध्ये पूर्णेकरांचे काही फोटो दिसत असून त्यामागे एक ऑडिओ क्लिप आहे. या क्लिपमध्ये, एक मोठा डावा खेळायचा आहे. जास्तीत जास्त काय होईल? माझा अध्याय संपेल किंवा नवीन अध्यायाची सुरुवात होईल, असं म्हटल्याचं ऐकू येत आहे.

“एक बडा डाव खेलना है इस बार! जादा से जादा क्या होगा या तो अपना अध्याय समाप्त, या फिर एक नया अध्याय का प्रारंभ” हे हिंदीमधील वाक्य या स्टेटसला ठेवण्यात आलेलं. हे सूचक विधानच पूर्णेकरांनी का ठेवलं होतं? त्यांना हल्ल्याची किंवा घातपाताची चाहूल लागली होती का? ते एखादा मोठा गौप्यस्फोट करणार होते का? या दिशेनेही तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. “ठाण्यात दडपशाही सुरु आहे. त्यांची दडपशाही किती दिवस चालेल? आपण उत्तर द्यायचं,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “गद्दारी त्यांनी केली आहे. त्यांच्या विरोधात आपण कायम उभे राहणार आणि आपण प्रदीप पूर्णेकर कुटुंबाच्या खंभीरपणे उभ राहायचं,” असं उद्धव यांनी विभागप्रमुखांच्या बैठकीत म्हटलं आहे.

ठाण्याची अवस्था बीड पेक्षा बिकट

ठाण्याचे पालकमंत्री आणि सध्याचे पुढारी कोण? हा राजकीय वैमनस्यातून झालेला प्रकार आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना केला. “पुरवणी एफआयआर दाखल झाली आहे. राम पूर्णेकरांनी सांगितलंय की, जिथे मिनाक्षी शिंदे राहतात त्या नीलकंठ टॉवरमध्ये जाताना त्यांनी हल्लेखोरांना पाहिलं. हत्येतील आरोपींसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. हा आरोप संजय राऊत, आदित्य ठाकरेंचा नाही हे मिनाक्षी शिंदेंनी हे समजून घ्यावं,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना राऊत यांनी, “पूर्णेकरांनी ड्रग्ज टोळ्या  आणि क्लस्टर विरोधात आघाडी उघडली होती. मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीचंच नाव का येतंय?” असा सवाल राऊतांनी विचारलाय. तसेच, “ठाण्याची अवस्था बीडपेक्षा बिकट झाली आहे. देवेंद्र फडणवीस अपयशी गृहमंत्री आहेत. संजय केळकर सुसंस्कृत आणि संघाच्या मुशीतले कार्यकर्ते आहेत. त्यांना तरी हे लक्षात घेतलं पाहिजे,” असं राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *