पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या केली असून ही घटना शनिवारी घडल्याचं सांगितलं जात आहे.
मयत कुटुंबाची ओळख पटली
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कुटुंब हे मूळचं केरळचे असून मागील दोन ते तीन वर्षांपासून मोरवाडीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. मृतांमध्ये विनोद पिल्ले (वय 50), पत्नी शैलजा पिल्ले (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्ले (वय 19) यांचा समावेश आहे. शनिवारी, 1 ऑगस्ट रोजी) सकाळी कोऑर्डिनेटर म्हणून येथील एका शाळेत काम करणऱ्या शैलजा कामावर न पोहोचल्याने सहकाऱ्यांनी संपर्क साधला. मात्र कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने त्याने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली.
पोलीस घरी पोहोचले तेव्हा काय दिसलं?
पोलिसांची एक टीम घरी पोहोचली असता घरात तिघेही बेशुद्ध अवस्थेत सापडले. पोलिस पोहोचल्यानंतर विनोद यांचा काही क्षणांमध्ये मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलीला यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण रविवारी, 2 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
सुसाइड नोट सापडली, त्यात काय लिहिलेलं?
पोलिसांना घरात आत्महत्येपूर्वी लिहिलेली, सुसाइड नोट सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये आर्थिक अडचणी, कर्ज आणि नोकरी गमावल्याचा उल्लेख आहे. विनोद यांना इंजिनिअरिंग कंपनीतील नोकरीवरुन सुमारे दीड वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आलं होतं. तेव्हापासून ते नोकरी आणि काम धंद्याच्या शोधात होते. या चिठ्ठीमध्ये कुटुंबाने कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले आहे.
विचित्र पद्धतीने स्वत:ला संपवलं
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तिघांनी घरात कोळसा पेटवून त्यावर रासायनिक पदार्थ टाकून विषारी धूर निर्माण केला. श्वसनावाटे हा धूर शरीरात गेल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिघांनी घरात जाळलेल्या कोळश्यावर ऑनलाइन ऑर्डरच्या माध्यमातून मागवलेलं सोडियम नायट्रेट टाकण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
घर विकलं होतं
या प्रकरणाचा संत तुकाराम नगर पोलीस ठाणे तपास करत आहे. या घरातील सर्व नमुने फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले आहेत. नातेवाईकांना यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. कुटुंबाने यापूर्वी नेहरू नगर येथील घर विकले होते आणि भाड्याच्या घरात राहत होते. त्यामुळेच ही घटना आर्थिक तणावातून झाल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे म्हटले आहे. ज्या पद्धतीने या तिघांनी स्वत:ला विषारी धुराच्या माध्यमातून संपवलं ते पाहता ही कल्पना त्यांना कुठून सुचली याचाही पोलीस तपास करत आहेत.
