Headlines

Kabaddi Double Gold : कबड्डीमध्ये भारताला डबल गोल्ड, ‘वाघिणीं’नंतर ‘वाघांनीही’ इराणला धूळ चारत केली गोल्डन कागगिरी

एशियन गेम्स २०२६ मध्ये भारताने चौथे सुवर्ण पदक नावावर केले आहे. भारतीय महिला कबड्डी संघाने सकाळी थरारक सामन्यात इराणचा पराभव करून इतिहास रचल्यानंतर, दुपारी पुरुषांच्या संघानेही बलाढ्य इराणला पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यासह भारताने आज कबड्डीमध्ये ‘डबल गोल्ड’ धमाका करत स्पर्धेतील आपले चौथे सुवर्णपदक जिंकले. फायनलमध्ये इराणविरुद्ध ४०-३४ अशा हाय-स्कोअरिंग सामन्यात विजय मिळवून भारताने अंतिम सामन्यांमध्ये सर्वाधिक गुण नोंदवण्याचा एक नवा विक्रम केला.

सुरुवातीपासून जबरदस्त संघर्ष

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळाला. पहिल्या १० मिनिटांत दोन्ही संघ ८-८ अशा बरोबरीत होते. कोणत्याही संघाला मोठी आघाडी घेता आली नव्हती. पण पहिला हाफ झाला तेव्हा इराणच्या संघाकडे १८-१७ अशी निसटती आघाडी होती. मात्र दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या खेळाडूंनी दमदार खेळ केला, रेडर्स आणि डिफेंडर्स दोन्ही आपले काम चोख बजावले आणि भारताच्या नावावर सुवर्णपदक केले.

दुसऱ्या हाफमध्ये डिफेन्सवर वर्चस्व

अर्जुन देशवाल या सामन्यात भारताचा सर्वात यशस्वी रेडर ठरला. त्याने दुसऱ्या हाफमध्ये इराणच्या डिफेन्सवर पूर्ण वर्चस्व गाजवले. रेडिंगमध्ये अर्जुनला अस्लम इनामदार यांनी मोलाची साथ दिली, तर डिफेन्समध्ये सुमित सांगवानने इराणच्या मुख्य रायडर्सना टॅकल केले. २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणने भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते, त्या पराभवाचा सव्याज परतावा करत भारताच्या वाघांनी मॅटवर आपले पूर्ण वर्चस्व गाजवले आणि सुवर्णपदकासह आशियाई किंगचा किताब पुन्हा एकदा जिंकला. भारतीय पुरुष कबड्डी संघाने नववे सुवर्णपदक जिंकून स्वतःचाच जुना रेकॉर्ड आणखी मजबूत केला आहे. १९९० मध्ये कबड्डीचा आशियाई खेळांमध्ये समावेश झाल्यापासून झालेल्या एकूण १० स्पर्धांपैकी नऊवेळा सुवर्णपदक नावावर केले आहे.

दरम्यान, भारतीय महिला संघाने गतविजेत्या इराणचा ३७-३४ असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये भारताकडे २२-१६ अशी मजबूत आघाडी होती, परंतु दुसऱ्या हाफमध्ये इराणने जोरदार पुनरागमन केले. सामना संपायला अवघी काही मिनिटे शिल्लक असताना दोन्ही संघांमधील फरक फक्त १ गुणाचा राहिला होता. मात्र, दबावाच्या क्षणी संयम राखत भारताच्या वाघिणींनी सामन्यावर पुन्हा पकड मिळवली आणि ३७-३४ अशा फरकाने सुवर्णपदक जिंकले. महिला कबड्डीच्या इतिहासातील भारताचे हे ‘चौथे सुवर्णपदक’ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *