Headlines

1 जुलैपासून थेट सुविधाच बंद! आर्थिक संकटामुळं एअर इंडियाचा मोठा निर्णय

 भारतातील महत्त्वाच्या विमानसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे एअर इंडिया. देशातील पहिली विमानसेवा पुरवणारी कंपनी अशीच एअर इंडियाची ओळख. मात्र गेल्या काही काळापासून ही कंपनी अनेक आर्थिक संकटांतून पुढे जात असल्यामुळं ही खर्च कपात करण्यासाठी कंपनीकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. ज्या निर्णयांची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

एअर इंडियानं असा कोणता निर्णय घेतला? 

 

1 जुलै 2026 पासून एअर इंडियातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना लागू करत त्यांच्या काही सुविधा बंद करण्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. कंपनीकडून फ्लाईट क्रू ला देण्यात आलेल्या माहितीनुसार 1 जुलैपासून आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान परदेशांमध्ये थांबण्यासाठी क्रू मेंबरना दिली जाणारी लॉन्ड्री फी अर्थातच कपडे धुवून घेण्यासाठी दिले जाणारे पैसे बंद केले जाणार आहेत. देशांतर्गत प्रवासासाठी मिळणारा खर्च मात्र सुरूच राहणार आहे.

एअर इंडिया आतापर्यंत देत होती पैसे… 

आतापर्यंत एअर इंडियाकडून वैमानिकांसह केबिन क्रूला परदेशात हॉटेलांवर थांबण्यासाठी, युनिफॉर्म स्वच्छ करून घेण्यासाठी निर्धारित रक्कम दिली जात असे. पुढील उड्डाणादरम्यान वैमानिक आणि क्रू चे कपडे सुस्थितीत आणि स्वच्छ असावेत यासाठी कंपनीकडून पैसे दिले जात होते. परदेशांमध्ये ही सुविधा यासाठी दिली जात असे कारण ही मंडळी त्या त्या विमानतळांवर कंपनीचं प्रतिनिधीत्त्वं करतात. मात्र मागील आर्थिक वर्षामध्ये आखाती युद्धामुळं एअर इंडियानं अनेक आर्थिक अडचणींचा सामना केल्यानं कंपनीनं हा निर्णय घेतला.

प्रत्येक लहानमोठ्या खर्चाची पडताळणी… 

सध्या एअर इंडियाकडून प्रत्येक लहानमोठ्या खर्चाची पुनर्पडताळणी करण्यासाठी सविस्तर माहिती मिळवली जात आहे. यामध्ये इंटरनॅशनल लॉन्ड्री फॅसिलिटीसाठीचे पैसे रोखणंही त्याचाच एक भाग म्हटला जातो. या बदलाशी ताळमेळ साधण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही वेळ द्याला वागणार आहे. यास पर्याय म्हणून ईमेलच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार कर्मचारी जिथं मुक्कामास असतील तिथं इस्त्री आणि त्यासाठीच्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशीही माहिती देण्यात आली आहे.

याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना जास्तीच्या गणवेशाची गरज आहे, त्यांनी ते मागण्यासाठी एक लिंकही जारी करण्यात आली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनानं घेतलेल्या या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. कर्मचाऱ्यांच्या मते खर्च कमी करण्यासाठी कंपनीनं असा निर्णय घेणं योग्य नसून, इतक्या गोष्टींनी मोठाले खर्च कमी करता येणार नाही आणि ‘महाराजा’ पुन्हा जागतिक दर्जावर जाऊ शकत नाही असाही सूर आळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *