Headlines

एल निनो तरीही मान्सूनला बळ, राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, आज 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल होण्याचे संकेत आहेत. काही भागात वादळी तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद होत आहे. सोमवारपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑगस्ट महिन्यात काही भागांत चांगला पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र जुलैच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. सोमवारी पुणे घाट माथा,नाशिक,जळगाव, अकोला, वर्धा आणि नागपूर आदी भागांत वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने या प्रदेशांना यलो अलर्ट जारी केला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेर, ग्वालियर, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील कमी दाबाचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून 3.1 किमी इंचीवर सक्रिय होता. दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून 5.8 किमी उंचीवर चक्राकार वारे तयार झाले आहेत.

पावसाचा जोर वाढणार?

शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी नैऋत्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यांनतर शनिवारी 8 ऑगस्ट रोजी दक्षिण गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि लगतच्या उत्तर ओडिशामध्ये आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही कमी दाबाच्या प्रणालींचा एकत्रित प्रभाव असल्याने देशातील बहुतांश भागात पावसाचा जोर पुढील काही दिवसात वाढण्याचा अंदाज आहे.

आज सोमवारी कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट

आज पुणे घाटमाथा, अकोला, अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा, नागपूर जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तर, उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या सरी बरसतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

13 ते 20 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागात पावसाचा जोर काहीसा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यातील दीर्घकालीन अंदाजात व्यक्त केला आहे. त्यामुळे या दरम्यान चांगला पाऊस नोंदला जाईल, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *