Headlines

दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका, डॉ. सुभाष चंद्रा यांचं आवाहन; अर्थमंत्र्यांकडे स्वतंत्र लेखापरीक्षकाची नियुक्ती करण्याची विनंती

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) लोन सेटलमेंट ऑर्डर संदर्भात डॉ. सुभाष चंद्रा यांनी व्हिडीओच्या माध्यमातून नेमकी वस्तुस्थिती मांडली आहे. NCLT प्रकरणादरम्यान सत्य मांडले गेले नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मी बँकिंग यंत्रणा, बँकिंग सचिव आणि देशाच्या अर्थमंत्र्यांकडे स्वतंत्र लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. या चौकशीतून संपूर्ण सत्य उघड होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका. सोशल मीडियावरील माहितीची खात्री करून घ्या असं आवाहन केलं आहे. तसंच काही प्रश्न असल्यास थेट आपल्याला ई-मेल करा असंही सांगितलं आहे.

आपली चूक मान्य करणारी मी पहिली व्यक्ती 

मागील दोन दिवसांपासून मला काही लोक अशा काही लोकांशी जोडत आहेत ज्यांनी देशातील आर्थिक यंत्रणेची पिळवणूक केली आहे. त्यांचे पैसे घेऊन कंपनीसाठी विमानं वैगेरे खरेदी केलं आहे. पण मला विश्वास आहे की, जे प्रेम, शुभेच्छा तुम्ही सर्वांनी दिल्या आहेत. त्या दिवशी मी माझ्या मनाने देशातील यंत्रणा, बँकिंग यंत्रणेला पत्र लिहिलं होतं. त्यात मी काही चुका केल्याचं लिहिलं होतं. आपली चूक मान्य करणारी मी पहिली व्यक्ती आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात अशी दुसरी व्यक्ती कोणी मला तरी दिसलं नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे घरही गहाण ठेवले

पुढे ते म्हणाले की, “मी संपूर्ण परतफेडीची ग्वाही दिली.  केवळ आश्वासनच दिले नाही, तर ते पूर्णही केले. कर्ज फेडण्यासाठी ‘झील’ (ZEEL) विकण्याचीही तयारी केली होती. कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे घरही गहाण ठेवले. पण सर्वांचे पैसे परत केले; ही गोष्ट अनेकांना रुचली नाही. एस्सेल ग्रुपने, कुटुंबाने पैसे परत केले हे न देणाऱ्यांना योग्य वाटलं नाही तेव्हापासून या गोष्टी सुरु आहेत”.

43 हजार कोटी रुपयांची परतफेड केली

‘NCLT प्रकरणादरम्यान सत्य मांडले गेले नाही. आम्ही काल प्रेस रिलीज काढली असून त्यात तथ्य मांडलं आहे. पण मला थेट संवादही साधायचा होता, जेणेकरुन माझ्यावरील प्रेम कायम राहील. माझी प्रतिमा मलीन करणे इतके सोपे नाही. कलयुगात जग पैशाच्या मागे सत्य दाबण्याचा प्रयत्न करतं. पण  पैशाच्या जोरावर सत्य लपवता येत नाही. सकाळी आपलाच चेहरा आरशात पाहायचा असतो. आपण काय योग्य केलं, काय चुकीचं केलं माहिती असतं. समूहावर 45 हजार कोटी रुपयांचे दायित्व होते; त्यापैकी सुमारे 43 हजार कोटी रुपयांची परतफेड केली,” अशी माहिती त्यांनी दिली आहे

620 कोटी रुपयांचा दावा निकाली काढला

“वैयक्तिक हमींशी (Personal Guarantees) संबंधित NCLT प्रकरण आहे. मी काही कर्जदारांना वैयक्तिक हमी दिल्या होत्या. काही कर्जदारांची पूर्ण रक्कम मी परतही केली होती, तरीही, कर्जदारांनी NCLT कडे दावे दाखल केले. हा दावा 22 हजार कोटी रुपयांचा नसून 3992 कोटी रुपयांचा आहे. 3992 कोटी रुपयांच्या दाव्याबाबतही काही प्रश्न उपस्थित होतात. 620 कोटी रुपयांचा दावा निकाली काढला आहे.  कर्जदारांना 1063 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे,” असं त्यांनी सांगितलं आहे.

2017 मध्ये ती संपत्ती 45,888 कोटी रुपये कशी होऊ शकते?

“सर्वांचे पैसे परत करण्यास मी पूर्णपणे कटिबद्ध आहे. मोठ्यांकडून हेच ​​शिकलो आहे की, देणे असलेली रक्कम परत केलीच पाहिजे. आमचे स्वतःचेही पैसे विविध ठिकाणी अडकलेले आहेत. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठीचा निधी राज्य सरकारांकडून येणे बाकी आहे. आणखी एक-दोन मालमत्तांची विक्री करण्याबाबतच्या योजनांवर काम सुरू आहे, एसेल समूहाच्या बाजारमूल्यालाच माझी वैयक्तिक संपत्ती समजण्याची चूक झाली. मी 2016 मध्ये राज्यसभेकडे 39.08 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती जाहीर केली होती. मग 2017 मध्ये ती संपत्ती 45,888 कोटी रुपये कशी होऊ शकते?,” अशी विचारणा त्यांनी केली.

स्वतंत्र लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नियुक्ती करण्याची विनंती 

“मी बँकिंग यंत्रणा, बँकिंग सचिव आणि देशाच्या अर्थमंत्र्यांकडे स्वतंत्र लेखापरीक्षकाची (ऑडिटर) नियुक्ती करण्याची विनंती केली आहे. या चौकशीतून संपूर्ण सत्य उघड होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

“नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी मी ओळखला जातो आणि यापुढेही ते करत राहीन. मी पुन्हा भरारी घेईन. स्वित्झर्लंडमधील एका मित्राच्या गुंतवणूक कंपनीत काम करण्याचा मानस आहे. याबद्दलची अधिक माहिती एका-दोन आठवड्यांत देईन,” असं ते म्हणाले आहेत.

काही प्रश्न असल्यास मला ईमेल करा

देशाच्या अर्थव्यवस्थेत आम्ही योगदान दिलं आहे. 8 हजार कुटुंबांना रोजगार दिला आहे. 50-52 वर्षाच्या कामकाजात देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान दिलं असून 60 हजार ते 70 हजार कोटी रुपयांचे व्याज दिलं आहे. 17 रुपयांपासून सुरुवात केली आणि देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले. कोणाच्याही दिशाभूल करणाऱ्या गोष्टींना बळी पडू नका. सोशल मीडियावरील माहितीची खात्री करून घ्या. माझे आयुष्य हे एका उघड्या पुस्तकासारखे आहे. काही प्रश्न असल्यास मला ईमेल करा; मी नक्कीच उत्तर देईन असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *