एसआयआर (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपी, झेन-झी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी पुकारलेल्या मुंबईतील आंदोलनात अभिनेता इम्रान खानने (Imran Khan) सहभाग घेतला होता. त्यावेळी, पोलिसांनी इम्रान खानला ताब्यातही घेतले होते. मात्र, त्यानंतर, 7 डिसेंबरपर्यंत देश सोडण्याची नोटीसही त्याला बजावण्यात आली होती. याप्रकरणी, अभिनेत्याने मुंबई उच्च न्यायालयात (Court) धाव घेतल्यानंतर, आता न्यायालयाकडून इम्रान खानला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने त्यास खडेबोलही सुनावले आहेत.
इम्रान खानकडे अमेरिकेचे नागरिकत्व असल्याने 7 डिसेंबरपर्यंत इम्रान खानला देश सोडण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयात आज पार पडलेल्या सुनावणीनंतर लिव्ह इंडिया नोटीसवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने इम्रान खान यांना खडेबोल सुनावले आहेत. तुम्ही नेमकं तिथे का गेला होतात, भारताचे नागरिक आणि OCI कार्ड यांचे हक्क वेगळे आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाकडून विचारणा करण्यात आली.
SIR प्रकरणी आंदोलन होतं, तुमचा त्याच्याशी काही संबंध असूच शकत नाही. तुमच्या Occupation मध्ये तुम्ही नोकरीचा शोध घेत असल्याचं म्हटलं आहे. तुम्हाला नोकरी मिळाली का, असा सवाल देखील उच्च न्यायालयाच्यावतीने विचारण्यात आला. त्यावर, सध्या आमच्याकडे पिक्चर नाही, माझं बालपण इथे गेलय, अशी माहिती इम्रान खानच्या वकिलांनी न्यायायलयात दिली
तुम्ही सेलिब्रिटी आहात, जर आंदोलनात तुमचा इंटरेस्ट नव्हता तर तिथे का गेलात. मग तुम्ही चित्रपटासाठी किंवा प्रमोशनसाठी गेलात का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली. याबाबत, तुम्हाला undertaking द्यावं लागेल, तुम्ही भारताचे नागरिक असता तर ठीक होतं. भारतीय नागरिकांनी इतरत्र किंवा अमेरिकेत अस केलं तर त्याची तात्काळ हकालपट्टीं करण्यात आली असती, असेही उच्च न्यायालयाने म्हटलं.
तुम्हाला लिहून द्यावं लागेल, न्यायालयाने झापलं
आम्हाला त्यांनी उत्कंटपोटी गेल्याचं सांगितलं आहे, त्यांनी तिथे इंटरव्ह्यू देखील दिले आहेत, असे इम्रान खान यांच्यावतीने सांगण्यात आले. तुम्ही भारतीय नागरिकांसारखे वागू शकत नाही, तुम्हाला SIR मुळे काही फरक पडण्याचा दूर दूर संबंध नाही, एवढी वर्ष तुम्ही रहात आहात, तुम्ही भारतीय नागरिकत्वासाठी का अर्ज केला नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने इम्रान खान यांना सुनावले. तुम्हाला OCI कार्ड होल्डर म्हणून राहायचं असेल तर undertaking द्यावं लागेल, हे सगळं करण्याची OCI कार्ड धारकाला परवानगी नाही. यापुढे अशा आंदोलनात ना सहभागी होणार, ना कोणाला जायला प्रवृत्त करणार असं undertaking द्यावं लागेल. तसेच तुम्हाला unconditional माफी मागावी लागेल, असेही उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
