Headlines

Explained: बाप्पा निघाले… AI पासून ते पोलिसांपर्यंत अन् बार्जवरील विसर्जनापासून कोळी बांधवांच्या सलामीपर्यंत; मुंबईतील विसर्जनची प्रमुख आकर्षणं

आज अनंत चतुर्दशीला मुंबईकरांकडून लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जाणार आहे. सकाळी आठनंतर लालबाग-परळमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा गणेश गल्ली म्हणजे ‘मुंबईचा राजा’ मंडपाबाहेर पडेल त्यानंतर मागोमाग लालबाग-परळमधील ‘लालबागचा राजा’, ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘तेजुकायाचा राजा’, ‘परळचा राजा’सह आदी गणेशमूर्ती लालबाग नाक्यावरून चौपाट्यांकडे रवाना होतील. यानिमित्ताने गिरगाव व जुहू चौपाटीवर मुंबईतील ‘राजां’चे दर्शन होणार आहे. लालबागच्या नाक्यावर ‘श्रॉफ बिल्डिंग’तर्फे मूर्तीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्याकरिता यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या परिसरात एकामागोमाग दाखल होणाऱ्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी उसळणार आहे. गणेश गल्लीच्या मंडळापासून लालबाग नाका ते आर्थर रोड नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा इमारतींच्या गॅलऱ्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी हाऊसफुल्ल होणार आहेत.

अत्याधुनिक बार्जच्या मदतीने थेट खोल समुद्रात विसर्जन

 

गणेश गल्लीच्या ‘मुंबईचा राजा’चे 29 वे वर्ष असून, त्यानिमित्ताने नवीन प्रयोग केला जात आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने 22 फूट उंच मूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटी येथे अत्याधुनिक बार्ज जहाजाच्या मदतीने थेट खोल समुद्रात केले जाणार आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता अंतिम महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली जाईल. बार्जवरील विसर्जनाची वेळ शुक्रवारी रात्री 8 ते 11 अशी निश्चित केली आहे, अशी माहिती मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांनी दिली.

‘लालबागच्या राजा’ला कोळी बांधवांची सलामी

‘लालबागच्या राजा’ची सकाळी 9 ते 10 दरम्यान पूजा व आरती होईल. सकाळी 11 च्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात होईल.लालबाग-परळपासून पुढील प्रवास करत गिरगाव चौपाटीवर दाखल होणाऱ्या राजाच्य मूर्तीचे विसर्जन शनिवारी सकाळी होईल.विसर्जनापूर्वी कोळी बांधवांकडून सलामी दिली जाईल. विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा सज्ज असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

मिरवणुकीतील गर्दीवर एआयची नजर

लाडक्या बाप्पाचा विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी मुंबई पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. मिरवणुकीत गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही या सर्व बाबींची पोलिसांकडून खबरदारी घेतली जाणार असून त्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे शहरातील लालबाग, परळ, जुहू, वर्सोवा, पवई आदी ठिकाणी भाविकांची तोबा गर्दी उसळते. त्या पार्श्वभूमीवर लालबाग-परळसारख्या गर्दीने हाऊसफुल्ल असणारा परिसर तसेच गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, पवई, मढ-मार्वे या चौपाट्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. गर्दी होणार नाही, मिरवणुका वेळेत पूर्ण होतील, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ड्रोन, सीसीटीव्हीबरोबरच एआयचा प्रभावी वापर करणार असल्याचे तसेच चौपाट्यांवर विसर्जन सुरळीत व व्यवस्थित पार पाडावे याकरिता अतिरिक्त तराफे, ट्रॉली, क्रेनची व्यवस्था केल्याचे सहआयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

अनंत चतुर्दशीला 84 मार्गावर बंदी

गणेश विसर्जनासाठी मुंबईतील विविध चौपाट्या, कृत्रिम तलाव आणि विसर्जनस्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता मुंबई पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. 84 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून 20 मार्ग एक मार्गी करण्यात आले आहेत.

अवजड वाहनांना आज नो-एंट्री

अनंत चतुर्दशीच्या दिवशी अवजड वाहने आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसना सकाळी 11 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत प्रवेश आणि रस्त्यावर धावण्यास निर्बंध असतील. भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पाणी, पेट्रोलियम पदार्थ, रुग्णवाहिका, स्कूल बस यांना या निर्बंधांतून सूट देण्यात आली आहे.

भुयारी मेट्रो रात्रभर धावणार

आज गणेश विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील सेवा शुक्रवारी रात्रभर सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यातून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) विसर्जन मिरवणुकीनंतर उशिरा घरी परतणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा दिला. नियमित वेळापत्रकानुसार या मार्गिकेवरील सेवा सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी सुरू होते आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असते. गणेशोत्सवासाठी शेवटची गाडी मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत केली होती. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सेवा थेट रात्रभर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 5 वाजून 55 मिनिटांनी मेट्रो 3 ची सेवा सुरू होईल. त्यानंतर रात्रभर गाड्या धावणार आहेत. ही विशेष सेवा शनिवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *