Headlines

Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना… नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNS) 20 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील (Mumbai) रवींद्र नाट्य मंदिरात (Ravindra Natya Mandir) आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) उपस्थित होते. कार्यक्रमात सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि अमित ठाकरे काय भूमिका मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

याच कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांच्या भाषणात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषण सुरू असताना ते अचानक थांबले आणि “मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरले. काही वेळाने ते पुन्हा व्यासपीठावर आले आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपले भाषण पूर्ण केले. या घटनेची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

Amit Thackeray Speech:  अमित ठाकरे भाषण करता करता अचानक थांबले

अमित ठाकरे म्हणाले की, “ज्या तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातला राजीनामा घेतला, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. मी राजसाहेबांचा मुलगा नसतो, तर मी राजकारणात आलो नसतो. हे मी खूप जाणूनबुजून बोलतो. मी दरवेळेस बोलतो. राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण ते प्रामाणिक आहेत. मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की, तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते, तर मी राजकारणात टिकलो नसतो. जी आंदोलन आपण केली, ती आंदोलने आपण विसरली पाहिजेत, कारण राज्याची परिस्थिती बिकट आहे. नव्याने आपण सुरुवात केली पाहिजे. आणखी वेगळे प्रश्न आपण घेतले पाहिजेत. मला काय बोलायचं सुचत नाही… मी परत येतो,” असे म्हणत अमित ठाकरे काही वेळासाठी व्यासपीठावरून खाली उतरले आणि पुन्हा भाषणासाठी आले.

Amit Thackeray Speech:  राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्यामागे

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, मी पाठ करून आलेलो नाही. तुम्हा सर्वांना बघून धडकी भरली. आतापर्यंत केलेली कामं विसरून जा. यापुढे आपल्याला काय करायचे आहे हे लक्षात ठेवा. तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. गेल्या आठवड्यात आपण व्हॅनमधून लोकांना बाहेर काढत होतो. विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो. हा आत्मविश्वास माझ्यात कुठून आला? मला माहिती आहे की, तुमची ताकद माझ्यामागे आहे आणि राज साहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्यामागे आहे. म्हणून माझ्यात आत्मविश्वास आला. तेव्हा पोलीस देखील शांत होते. काही करत नव्हते. शांत होते, कारण काय? पोलिसांच्या मागे राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक आहेत.

Amit Thackeray Speech: मला तुमची साथ हवीय

राज्यात काय सुरू आहे? आपण भीषण परिस्थिती पाहिली आहे. चंद्रकांत पाटील… चंपा काय बोलले? ते दगड चंपाच्या घरी पाठवा. केंद्रातला राजीनामा आणला, राज्यातला आणायला वेळ लागणार नाही. दिल्लीतील आंदोलनातील एका विद्यार्थी होता, ‘मारा, मारा’ म्हणणारा. तो नागपूरचा आहे, मुख्यमंत्र्यांच्या शहरातला आहे; पण मुख्यमंत्री त्यावर काहीही बोलले नाहीत. आपण मतदान कशाला करता? विकास व्हावा म्हणून ना? चार वर्षे तुम्हाला मारतात आणि एक वर्ष तुम्हाला मलम लावतात. ज्याला तुम्ही मतदान करता, त्याने पाच वर्षांत काही केलं नाही, तर तुम्ही त्याला बदला. आजपासून आपण सदस्य नोंदणीला सुरुवात करतोय. सदस्य नोंदणी झाल्यावर मला भेटायचं आहे. विद्यार्थी कोणीही असो, मी भेटणार आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांना घडवायचा आहे, तो घडेलच. पण, महाराष्ट्राला हेवा वाटेल अशी विद्यार्थी संघटना मला बनवायची आहे. मला तुमची साथ हवी आहे,” असे देखील अमित ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *