मुंबईसह महाराष्ट्रात आता रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स रद्द होणार आहे. या संदर्भात आदच शासन निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटर व्हेहिकल अॅक्ट 1988 मध्ये बदल करून मोटर अमेंडमेंट रूल्स 2026 आज लागू होणार आहे.
राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने मराठी भाषेची सक्ती केली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या मातीतील भाषा बोलते येणे गरजेचं आहे. त्यामुळं राज्य सरकारने महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीदेखील रिक्षा व टॅक्सी चालकांना अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर आता थेट राज्य सरकार कायदाच करणार आहे.
नवीन नियमाप्रमाणे जर रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसेल, जुजबी मराठी देखील बोलता येत नसेल तर त्याला आधीच एका महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. त्या एका महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही, तर त्याचे लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. इतकंच नव्हे तर या नंतरदेखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरदूत या नवीन कायद्यात असणार आहे.
आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे. परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, तो मंजूर झाल्याने आज शासन निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठीच्या मोहिमेला आता कायद्याचे संरक्षण मिळणार आहे.
रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान
रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान’द्वारे राज्यभरातून एक लाखाहून अधिक चालकांनी व्यावहारिक मराठी भाषेचे प्रशिक्षण पूर्ण केले. या अभियानाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या अभियानातून मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी वाहनचालकांना यावेळी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.
