Headlines

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, XUV कार थेट कंटेनरमध्ये घुसली, मुलासह तिघांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे हा अपघात झाला आहे. ड्रायव्हरला झाप लागल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक समोर आली आहे.

वेरूळ परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकहून जालन्याकडे जाणाऱ्या XUV कारने समोरून जाणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. चालकाला झोप लागल्याने आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात XUV कारमधील चालक प्रतीक रामकिसन जगदाळे, श्रेया राजेंद्र पांडे आणि अंदाजे तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अपघातानंतर तिघेही वाहनात अडकले होते. वेरूळच्या QRV पथकाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले आणि महामार्ग रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले.

दरम्यान, सुरक्षा पथकाने घटनास्थळी बॅरिकेड्स लावून वाहतूक सुरळीत केली. दोन्ही वाहने आणि त्यातील सामान दौलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पुणे इंदोर महामार्गावर अपघात

पुणे इंदोर महामार्गावर चांदवड तालुक्यातील कानडगाव हद्दीमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर पुणे इंदोर महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली.

समृद्धी महामार्गावर ट्रक अडवून चालक आणि क्लिनरला मारहाण; कांद्याने भरलेला ट्रक जबरीने पळवून नेला

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर ट्रक अडवून चालक आणि क्लिनरला मारहाण करत कांद्याने भरलेला ट्रक जबरीने पळवून नेल्याची  घटना समोर आली आहे. डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत, समृद्धी महामार्गावर मध्यरात्री  हा प्रकार घडला. कारमधून आलेल्या चार जणांनी ट्रक अडवला आणि चालक-क्लिनरला मारहाण करून ट्रक आणि त्यातील कांदा घेऊन पोबारा केला. याप्रकरणी ट्रक, कार आणि चारही संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

रोहित पवारांचा सरकारला थेट अल्टिमेटम; 15 दिवसांत नुकसानभरपाई द्या, नाहीतर समृद्धी महामार्ग बंद

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याच मोर्चादरम्यान आमदार रोहित पवारांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला. येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही, तर समृद्धी महामार्गावर एकही गाडी फिरू देणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला. आम्ही पवार साहेबांचे पट्टे आहोत. दिलेला शब्द पाळल्याशिवाय राहत नाही, असं म्हणत रोहित पवारांनी सरकारला थेट आव्हान दिले.  हजारो लोकांची समृद्धी तुम्ही बंद पाडली, तर समृद्धी महामार्ग बंद पाडण्याची ताकद आमच्यात आहे, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *