‘एनआरसी’ हिंदुच्याही मुळावर घाव घालणारा कायदा – उद्धव ठाकरे
- 157 Views
- February 05, 2020
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on ‘एनआरसी’ हिंदुच्याही मुळावर घाव घालणारा कायदा – उद्धव ठाकरे
- Edit
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे की मी एनआरसी होऊ देणार नाही. मी कोणालाही कोणाचा अधिकार हिसकावून घेऊ देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआरसीबद्दलची आपली भुमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. उलट एक कायदा असा आहे ज्याची चर्चा होणार नाही किंबहुना होत नाही. तो म्हणजे एनआरसी. हा कायदा केवळ मुसलमानांपुरता नाही. जर हा कायदा भाजपानं अंमलात आणायचं ठरवलं तर त्याचा केवळ मुसलमानांना त्रास होणार नाही तर तुम्हा-आम्हाला हिंदूंनाही पर्यायानं सर्व धर्मांना त्रास होणार आहे. यामुळं धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जाणार आहे. केवळ मुसलमानांच्याच नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर येणारा हा कायदा आहे. आसामपुरता हा महत्वाचा कायदा आहे. पण संपूर्ण देशात तो येऊ नये. आसाममध्ये १९ लाख लोकांना त्यांचं नागरिकत्व सिद्ध करता आलेलं नाही. त्यातील १४ लाख लोक हे हिंदू आहेत. तिथल्या आमदार-खासदारांचे ते नातेवाईक आहेत.”
…तर आदिवासी देखील रस्त्यावर येतील
बांगलादेशी आणि घुसखोरांना हाकलावंच लागेल ही बाळासाहेबांची भुमिका आहे ती काय शिवसेनेची नवी भुमिका नाही. यामुळे काही टक्के घुसखोरांसाठी तुम्ही सर्व देशातील लोकांना रांगेत उभं करता आहात. हे नोटाबंदी सारखचं झालं. यामुळे तुमच्या-आमच्या नातेवाईकांना रांगेत उभं रहावं लागेल. या कायद्यामुळं आदिवासींचं काय होणार? जेव्हा त्यांना हे कळेल तेव्हा ते प्रचंड संख्येने रस्त्यावर येतील. ज्यांच्याकडे जन्माचे दाखले नसतील त्या सर्वाधिक हिंदूंना या एनआरसीची त्रास होईल. हा कायदा लागू करण्याचा विषय अजून तरी देशासमोर आलेला नाही त्यामुळे आत्ताच त्याच्याविरोधात आणि समर्थनार्थही मोर्चे काढण्यात अर्थ नाही, अशा शब्दांत मनसेसह इतर सर्वच संघटनांना मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला.