सोशल मीडियावर आपल्या मनोरंजक व्हिडिओ आणि फॅमिली कंटेटसाठी ओळखली जाणारी प्रसिद्ध युट्युबर शिवानी कपिला सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे; पण यावेळी तिच्याबद्दलच्या चर्चेचं कारण कोणताही तिचा व्हिडिओ नसून वेगळंच आहे.
शिवानी कपिलाच्या घरातच एक दुर्दैवी अपघात झाला. चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाल्यामुळे काही मिनिटांतच तिचे स्वप्नातील घर आगीच्या भडक्यात उद्धवस्त झाले. या घटनेत तिचे युट्यूब ‘डायमंड प्ले बटण’, मौल्यवान वस्तू आणि अनेक वर्षांच्या जिव्हाळ्याच्या आठवणींसह लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. मात्र, सर्वात मोठा दिलासादायक बाब म्हणजे या अपघातात कुटुंबातील कोणालाही दुखापत झाली नाही.
इन्स्टाग्रामवर व्यक्त केल्या भावना
अपघातानंतर, शिवानी कपिलाने इन्स्टाग्रामवर आपल्या जळालेल्या घराचे फोटोंसोबत अत्यंत भावूक करणारी पोस्ट शेअर केली. तिने सांगितले की, जरी आगीत तिची खोली, ‘डायमंड बटण’ आणि आयुष्यातील अनेक अमूल्य आठवणी जळून गेल्या असल्या, तरी तिचे कुटुंब सुरक्षित राहिले या गोष्टीने तिला दिलासा दिला. तिने लिहिले की आता नव्याने सुरुवात करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा अधिक जोमाने काम करुन पुनरागमन करण्याचा निर्णय तिने घेतला. तसेच, तिने आपल्या हितचिंतकांचेही आभार मानले, ज्यांच्या मेसेज आणि फोन कॉल्सनी या कठीण काळात तिचे मनोबल वाढवले.
15 मिनिटांत बदलले आयुष्य
शिवानीच्या म्हणण्यानुसार, ही घटना पॉवर बँक चार्जिंगला लावली असताना घडली. साधारण 15 मिनिटांनंतर एक मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच आग संपूर्ण खोलीत पसरली. जर ही पॉवर बँक रात्री तिच्या अंथरुणाजवळ चार्जिंगला लावली असती आणि तेव्हा स्फोट झाला असता, तर तिच्या संपूर्ण कुटुंबावर एखादे मोठे संकट ओढवले असते, या गोष्टीचा विचार करुनही जीव घाबरा होतो असे तिने सांगितले.
मॅनेजरने तत्परतेने वाचले प्राण
अपघाताच्या वेळी नशिबाने तिची साथ दिली. योगायोगाने, तिचे मॅनेजर काही कामासाठी तिच्या घरी आले होते. त्यांना खोलीतून धूर निघताना दिसला आणि त्यांनी त्वरित आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग इतक्या वेगाने पसरली होती की ती लवकर नियंत्रणात आणणे कठीण झाले. अखेरीस अग्निशमन दल आणि इतरांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. या घटनेत जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे.
केवळ वस्तूच नाही, तर आठवणीही जळून खाक
शिवानीने सांगितले की, आगीत केवळ महागडे कपडे, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेच नष्ट झाली असे नाही, तर तिच्या मुलीच्या बालपणाशी निगडीत अनेक मौल्यवान आठवणीही जळून खाक झाल्या. तिच्या यूट्यूबच्या प्रवासातील यशाचे प्रतीक असलेले ‘डायमंड प्ले बटण’ देखील आगीच्या जळाले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की खोलीतील एअर कंडिशनर पूर्णपणे वितळले.
मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येऊनही, अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमातून तिने आपले घर आणि करिअर उभे केले होते, पण निष्काळजीपणाच्या एका क्षणाने तिची अनेक वर्षांची कमाई आणि आठवणी व मेहनत एका क्षणात नष्ट केल्या.
सर्वांसाठी एक महत्त्वाचे आवाहन
या धक्कादायक अनुभवानंतर, शिवानी कपिलाने सर्वांना आवाहन केले आहे की, मोबाईल फोन, पॉवर बँक किंवा बॅटरीवर चालणारे कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण कधीही अंथरुणावर किंवा अंथरुणाजवळ चार्जिंगला ठेवू नये. जर माझ्या या अनुभवामुळे एखादे कुटुंब सावध झाले आणि भविष्यात एखाद्याचा जीव किंवा घर वाचला, तर मला वाटेल की माझ्या या वेदनादायी अनुभवातून एक मोलाचा धडा मिळाला आहे.
