मुंबई आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळत असून भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अनेक सखल भागांत पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे आणि अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भांडुप व्हिलेज रोडच्या सखल भागात, महापालिका नाल्याजवळ असे पाणी साचले आहे. भांडुपच्या वरच्या भागातून वाहत येणाऱ्या तसेच कस्तुरी विद्यालय नाल्यातून येणाऱ्या पाण्यामुळे रस्त्यावरील पाण्याला प्रचंड वेग प्राप्त झालाय. एस वार्डने पाणी उपसण्यासाठी बसवलेला पम्प सुरू असला तरी गाळ उपसला न गेल्याने तो कुचकामी ठरत आहे. ऐन दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी मुलांनी जीव मुठीत धरून या रस्त्यातून मार्गक्रमण केले.
मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पावसामुळे मुंबईतील लोकलसेवा, रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तर मुंबईतील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी सबवे अद्यापही पाण्याखालीच आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून केलं जात आहे.
