आगामी कुंभमेळा महाराष्ट्रात होत आहे. नाशिकमध्ये 2027मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम हाती घेण्यात येत आहेत. कुंभमेळ्याची भव्यता अधिक वाढवण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसंच, कुंभमेळ्याचे नामकरण करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
दर 12 वर्षांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या साठी राज्य शासनाकडून दीड वर्षांपासून तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यादरम्यान सोयी व सुविधा सुसज्ज राहाव्यात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून तब्बल 34 हजार कोटींचा खर्च करण्यात येत आहे. कुंभमेळा यथासांग पार पडावा यासाठी प्रथमच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण देखील स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळा भव्यदिव्य व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक सिंहस्थ ऐवजी महासिंहस्थ असे नामकरण केले आहे. त्याचे ब्रेडींग तर करण्यात येणार आहेच, शिवाय बोधचिन्हाची अधिकृतता म्हणून त्यावर ट्रेडमार्कचे शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे, अशी माहिती कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई
कुंभमेळा कामांचा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी नाशिज पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आगामी कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर 30 ते 32 हजार कोटींच्या होणाऱ्या कामांचा गैरफायदा घेऊन मोठी फसवणूक करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट सहीने 400 ते 500 कोटींचे बनावट टेंडर काढण्यात आले. 9 ठेकेदारांना काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत 65 लाख रुपये उकळले आहेत. मूळ वर्क ऑर्डरची कॉपी-पेस्ट करून बनावट वर्क ऑर्डरही दिली असल्याचे समोर आले आहे. वर्क ऑर्डर घेऊन ठेकेदार सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडे गेल्यानंतर फसवणूक उघड झाली आहे.
