Headlines

लघवी भरलेल्या शेकडो बाटल्या, फाटके कपडे अन्…; धार्मिक स्थळी कोणी केला 6350293 किलो कचरा?

कावड यात्रेनिमित्त यंद उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते. मात्र आता ही यात्रा संपल्यानंतर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या हरिद्वार शहरामध्ये तब्बल 7000 टन म्हणजेच 63 लाख 50 हजार 293 किलो कचऱ्याचा ढिगारा जमा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  30 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान कावड यात्रा संपन्न झाली. यामध्ये जवळ सुमारे 4.80 कोटी भक्त हरिद्वारला पोहोचले होते. श्रावण शिवरात्रीला ही यात्रा संपल्यानंतर शहरातील गंगा घाट, हर की पौडी, बाजार, पार्किंग आणि कावड मार्गांवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग सापडले आहेत. शहर सोडताना भक्तांनी सर्वत्र टाकून दिलेले कपडे, प्लास्टिकच्या वस्तू आणि इतर कचरा पसरल्याचं दिसून आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असल्याने स्थानिक प्रशासनासमोर हा कचरा साफ करण्याचं मोठं आवाहन उभं राहिलं आहे.

चेंजिंग रूम्समध्ये लघवीने भरलेल्या बाटल्या

गंगा घाटांवर सुमारे 4500 टन कचरा होता अशी माहिती समोर आली आहे. कचऱ्यात प्लास्टिक शीट, पॉलिथिन, प्लेट-कप, बाटल्या, फाटके कपडे आणि इतर वस्तू होत्या. अत्यंत किळसणा प्रकार म्हणजे अनेक ठिकाणी पाणी पिऊन झाल्यानंतर प्लास्टिकच्या रिकामा बाट्यांमध्ये चक्क लघवी करुन त्या बाटल्या तशाच जागोजागी ठेवण्यात आल्याचं दिसून आलं. या बाटल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हॅण्ड ग्लोजवगैरे नसल्याने हातानेच उचलाव्या लागल्या. कर्मचाऱ्यांना कपडे बदलण्याच्या खोल्यांमधून म्हणजेच तात्पुत्या उभारण्यात आलेल्या चेंजिंग रूम्समध्ये लघवीने भरलेल्या बाटल्या हातमोजे किंवा मास्क न वापरता काढाव्या लागल्या.

कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हा सारा प्रकार संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. एका कर्मचाऱ्याने तर धार्मिक उत्सव आणि पर्यावरणाचे जतनामध्ये मोठी तफावत निर्माण होत असून या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सफाई कर्मचाऱ्यांना अशा अवस्थेत काम करावं लागत असल्याबद्दल काही कर्मचाऱ्यांनी अशी परिस्थिती दुर्देवी असल्याचं नमूद केलं आहे.

गंगोत्रीलाही फटका

हिमालयातील ‘प्लास्टिक-मुक्त क्षेत्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगोत्रीलाही प्लास्टिकच्या कचऱ्याचा फटका बसला आहे. भाविक निघून गेल्यानंतर तिथे तब्बल 57 पोती कचरा गोळा करण्यात आला. शहरातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरात्रीनंतर स्वच्छता करण्यासाठी कर्मचाऱ्यांची पथके रात्रभर कार्यरत होती. असं असलं तरी कचऱ्याचं प्रमाण पाहता त्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न कायम असल्याचं सांगितलं जात आहे.

विशेष ‘महा-स्वच्छता अभियान’

हरिद्वार नगर निगम आणि जिल्हा प्रशासनाने 12 ते 18 ऑगस्टपर्यंत विशेष ‘महा-स्वच्छता अभियान’ सुरू केले आहे. या माध्यमातून शहर स्वच्छ केलं जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *