स्वाईन फ्लूचा उस्मानाबाद जिल्ह्यात पहिला बळी
- 193 Views
- September 25, 2018
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on स्वाईन फ्लूचा उस्मानाबाद जिल्ह्यात पहिला बळी
- Edit
स्वाईन फ्लुमुळे लोहार तालुक्यातील जेवळी येथील एका महिलेचा पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ही महिला उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाईन फ्लुचा पहिलाच बळी ठरल्याने परिसरात भिती पसरली आहे.
जेवळी येथील एका ६० वर्षीय महिलेला मागील १५ दिवसांपूर्वी ताप, सर्दी आणि खोकल्याची लागण झाली होती. आजाराने त्रस्त झाल्याने सुरवातीला त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आजार अधिक बळावत गेला. परिणामी श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी त्यांना उमरगा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील डॅाक्टरांनी स्वाईन फ्लुची लक्षणे असल्याने उपचारासाठी अन्यत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर या रुग्णास नातेवाईकांनी १३ सप्टेंबरला पुणे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर या महिलेला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. याची माहिती आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर १५ सप्टेंबरला जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने जेवळी येथे भेट देऊन याबाबत आढावा घेतला होता.
पुणे येथे उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेपासून या महिलेची प्रकृती नाजूक झाली होती. सकाळी आठ वाजता या महिलेचे निधन झाले. जेवळी व परिसरात साथीच्या रोगाने अनेक रुग्ण बाधित आहेत. परंतु येथील स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.