Headlines

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज देशातील तब्बल 20 राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा त्यामुळं पूर्व आणि मध्य भारतातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर एकीकडे उत्तर भारतातून मान्सूनने माघार घेतली आहे.

राठवाडा, कोकण प्रदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर आहे. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात ज्या ठिकाणी पावसाने ओढ दिली होती त्या भागांना दिलासा मिळाला आहे. या भागांत पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वायव्य दिशेला सरकण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश भागात पावसाने जोर धरला आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असून सतर्कतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, विदर्भाताली यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात ताशी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात
वादळी पावसाचा प्रभाव 27 सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार आदी भागात हलक्या सरींचा अंदाज असून उर्वरित संपूर्ण राज्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

वादळाचे संकट

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाची तीव्रता वाढत आहे. ओडिशा-आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून डिप डिप्रेशन निर्माती होण्याचे संकेत आहेत. आज बुधवारपर्यंत किंवा उद्या गुरुवारपर्यंत ही प्रणाली ओडिशातील गोपाळपूरनजीक किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *