Menu

प्रचारातही शिवेसना-भाजपा युतीची ‘आघाडी’, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन फुंकणार रणशिंग

nobanner

लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष प्रचाराकडे लक्ष देऊ लागला आहे. प्रचारसभा करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं घोडं अद्याप जागावाटपावर अडलं आहे. मात्र शिवसेना-भाजपाने येथेही आघाडी घेतली असून प्रचाराचाही कार्यक्रम ठरला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबबाईचं दर्शन घेत युतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. २४ मार्चला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा युतीची एकत्रित सभा होणार आहे.

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे. फक्त युतीच नाही तर लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र यामधल्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चढाओढ दिसून येते आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगुंटीवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात करण्यावर एकमत झालं. यासोबत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातही एकत्र प्रचारसभा घेण्याचं बैठकीत ठरलं आहे.

जालना येथील जागेचा वाद हा शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांसाठी डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे. रावसाहेब दानवे हे सध्या जालन्याचे खासदार आहेत. मात्र शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना याच जागेवरून लढायचे आहे. दानवे आणि खोतकर या दोघांमध्ये असलेला छत्तीसचा आकडाही सर्वश्रुत आहेच. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला होता तेव्हापासूनच खोतकर यांनी दानवेंविरोधात दंड थोपटले होते. मात्र युती झाल्यावरही त्यांचा हाच तोरा कायम आहे. त्यामुळे जालन्याच्या जागेचा पेच कसा सोडवायचा याचे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.

जालन्याच्या या डोकेदुखीसोबतच इतर जागांबाबतही शिवसेना आणि भाजपा यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. भिवंडीची जागा शिवसेनेला हवी असल्याचीही चर्चा आहे. सध्या या ठिकाणी कपिल पाटील हे भाजपाचे खासदार आहेत.

दुसरीकडे रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले हे ईशान्य मुंबईतून लढण्यास उत्सुक आहेत. किरिट सोमय्या शिवसेनेलाही नकोसे आहेत त्यामुळे या जागेवरून आठवलेंनी लढण्यास शिवसेनेचा काहीही आक्षेप नाही. तर शिवसेनेकडे असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपाला हवा आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. मात्र हा मतदारसंघ भाजपाला त्यांच्या उमेदवारासाठी हवा आहे.