पितृपक्षातही भाज्या महागच
- 165 Views
- September 18, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on पितृपक्षातही भाज्या महागच
- Edit
श्रावण, त्यानंतर आलेला गणेशोत्सव यांमुळे आधीपासूनच महाग झालेल्या भाज्यांचे दर उतरणीऐवजी चढणीच्याच मार्गावर आहेत. मुसळधार पावसामुळे घटलेली भाज्यांची आवक वाढूनदेखील मुंबई, ठाण्यातील किरकोळ बाजारांत भाज्यांचे दर चढेच आहेत.
पितृपंधरवडय़ात भाज्यांचे दर कमी होतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. मुसळधार पावसाने मात्र हे गणित बिघडवले आहे. भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गवार, कोबी, तोंडली, वाटाणा, वांगी आणि सिमला मिरची या भाज्या किरकोळ बाजारात प्रति किलोमागे १० ते २० रुपयांनी महाग झाल्या आहेत. आवक चांगली असूनही पावसामुळे भाज्या खराब होत असल्याने माल कमी भरला जात आहे. त्यामुळे हे दर वाढल्याचे किरकोळ विक्रेते सांगत आहेत.
नवी मुंबई येथील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. पंधरा दिवसापूर्वी वाशीमध्ये भाज्यांच्या ३३२ गाडय़ा येत होत्या. परंतु सध्या ६०० ते ७०० गाडय़ांची आवक होत आहे, अशी माहिती वाशी येथील बाजार समिती आवारातील सूत्रांनी दिली. ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथील किरकोळ बाजारात पाणी साचत असल्याने भाज्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे विक्रेते भाज्या कमी प्रमाणात भरत आहेत. त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
कांदा आणखी रडवणार
वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा हा नाशिक, लासलगाव, पुणे आणि जुन्नर या भागातून येतो. कांद्याच्या पिकात पाणी शिरल्याने मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झालेले आहे. महिनाभरापूर्वी वाशीच्या बाजारात कांद्याच्या १४० ते १५० गाडय़ा येत होत्या. परंतु आता कांद्याच्या १०० ते १२० गाडय़ा येत असल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजारातील कांदा-बटाटा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पंधरा दिवसांपूर्वी कांद्याचा दर घाऊक बाजारात २६ रुपये प्रति किलो तर किरकोळ बाजारात ३५ रुपये प्रति किलो एवढा होता. तर आता कांद्याचा दर घाऊक बाजारात ३५ रुपये प्रति किलो असून किरकोळ बाजारात ५० रुपये प्रति किलो एवढय़ा दराने विकला जात आहे. कांद्याचे उत्पादन पूर्ववत होत नाही, तोपर्यंत भाव चढेच राहणार असल्याचे किरकोळ विक्रेत्याने सांगितले.
बाजारात पावसाचे पाणी साठून राहिल्याने भाज्या मोठय़ा प्रमाणावर खराब होत आहेत. त्यामुळे तुलनेने भाज्यांची माल कमी भरला जात आहे. भाज्यांचे हे दर येत्या महिन्याभरापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
श्याम शेटय़े, किरकोळ भाजी विक्रेते
भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर
१५ दिवसांपूर्वी आताचे
भेंडी ६० ८०
फरसबी १०० १२०
फ्लॉवर ४० ६०
गवार ५० ६०
कोबी ४० ६०
तोंडली ६० ८०
वाटाणा १०० १२०
वांगी ५० ६०
सि. मिरची ५० ६०