हिंदी कलाविश्वामध्ये चाहत्यांचं अमाप प्रेम असणाऱ्या कलाकारांचं नाव घेतलं, की यामध्ये काही नावं हमखास समोर येतात आणि सलमान खान हे त्यातलंच एक नाव. या अभिनेत्याच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर सातत्यानं असणारी चाहत्यांची गर्दी, भाईजानचा वाढदिवस असो किंवा मग त्याच्या नव्या चित्रपटाचं निमित्त, सलमानवर जीव लावणारे अनेकजण त्याची एक झलक टीपण्यासाठी वांद्रे येथील त्याच्या गॅलेक्सी नावाच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करतात. मात्र, इथून पुढं सलमान इथं चाहत्यांना भेटणार नाही. कारण, तो हे राहतं घर सोडतोय.
प्राथमिक माहितीनुसार सलमान खान त्याचं गॅलेक्सी हे निवासस्थान सोडर असून एका नव्या इमारतीमध्ये वास्तव्यास जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. बिष्णोई गँगकडून मिळणारी धमकी आणि 2024 मध्ये त्याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं त्यानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. सलमान वांद्र्यातच स्वत:चा एक भूखंड खरेदी करत तिथं नवं घर उभारत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या नव्या घरासाठी 6 मजली इमारतीला परवानही मिळाली असून, या वास्तूच्या बांधकामानंतर सलमान तिथं संपूर्ण कुटुंबासह वास्तव्यास जाईल.
आता कुठं असेल सलमानचं नवं घर?
1974 पासून सलमान राहतोय त्या गॅलेक्सीनं सलमानला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना पाहिलं, त्याचं हेच निवासस्थान आता येत्या काळात त्याच्यापासून दुरावेल. सूत्रांच्या माहितीनुसार वांद्रे परिसरातच समुद्रकिनारी सलमानचा नवा सहा मजली आशियाना उभा राहत आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) नं त्यासाठी 16 जून रोजी प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. वांद्र्यातील चिम्बई इथं त्याचं हे नलवं निवासस्थान असेल, जे गॅलेक्सीपासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे.
सलमानचं हे नवं घर त्याची आई सलमा खान यांच्या नावावर असणाऱ्या भूखंडावर तयार होणार आहे. इथं 1956 पूर्वी एक दुमजली घर होतं. जे अतिशय पडीक अवस्थेत असतानाच खान कुटुंबानं खरेदी केल्यानंतर जमीनदोस्त केलं होतं. दरम्यान सलमानच्या नव्या घराच्या रुपात उभ्या राहणाऱ्या इमारतीला तळमजला, स्टील्ट पार्किंगसह सहा मजले असतील. या इमारतीच्या भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ आहे 1014 चौरस मीटर. सच डेवलरपर्स यांच्याकडून इमारतीचं बांधकाम केलं जाणार असून, प्राथमिक माहितीनुसार या बांधकामादरम्यान कोणतीही वृक्षतोड केली जाणार नाही. इतकंच नव्हे तर त्याऐवजी इमारचीच्या आजुबाजूला विविध प्रजातींची वृक्षलागवड केली जाईल. मुख्य रस्त्यापासून दूर एका शांत वाटेवर सलमानचं हे नवं घर त्याच्या कुटुंबाला सुरक्षितता देईल असं म्हटलं जात असून, आता अभिनेत्याच्या टीमकडून याबाबतची अधिकृत माहिती प्रतिक्षेत आहे.
