Headlines

Salman Khan Sells His Luxury Bandra Flat: सलमान खाननं विकलं वांद्र्यातील लग्झरी अपार्टमेंट; कमावलाय कोट्यवधींचा नफा, खरेदीदारानं भरली तब्बल 21 लाखांची स्टॅम्प ड्युटी

बॉलिवूडचा (Bollywood News) दबंग भाईजान सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असतो. साठीला टेकलेला सलमान खान (Actor Salman Khan) आजही कित्येक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे, तर कित्येक तरुणांचा स्टाईल आयकॉन आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान त्याचं वांद्रे (Bandra) येथील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’मधील (Galaxy Apartments) राहतं घर सोडून नव्या घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्यात. अशातच भाईजाननं वांद्र्यातील त्याचा एक आलिशान फ्लॅट विकल्याची माहिती मिळतेय. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खाननं 2015 मध्ये 2.88 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती मिळतेय.

9 जुलै रोजी वांद्र्यातील फ्लॅटचा व्यवहार पूर्ण (Salman Khan Sells Bandra Flat)

‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, सलमान खाननं वांद्रे येथील ‘शिव-आस्था हाइट्स’ (Shiv-Astha Heights) इमारतीमधील आपला 758 चौरस फुटांचा फ्लॅट विकलाय. त्यानं हा फ्लॅट, जो मूळतः 2.88 कोटी रुपयांना खरेदी केला होता आणि सुमारे 3.50 कोटी रुपयांना विकला. या मालमत्तेसोबतच दोन कार पार्किंगच्या जागांचाही समावेश आहे. फ्लॅटच्या नोंदणी कागदपत्रांवरून असं दिसून येतंय की, या मालमत्तेचं मूल्य कार्पेट एरियानुसार, प्रति चौरस फूट सुमारे 46,000 रुपये इतकं निश्चित करण्यात आलं होतं.

हा फ्लॅट मुनिरा अकबर अली दांडावाला, महदियाली अकबर अली दांडावाला आणि झेहरा यांनी खरेदी केलाय. कागदपत्रांनुसार, खरेदीदारांनी 21 लाख रुपये मुद्रांक शुल्क (Stamp Duty) आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरलंय. मात्र, या व्यवहाराबाबत सलमान किंवा नवीन मालक यांपैकी कोणीही अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

इतक्या वर्षांनंतर सलमान खान ‘गॅलेक्सी’ सोडणार? (Salman Khan Leave Galaxy Apartments?)

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमधून असं समोर आलंय की, लॉरेन्स बिश्नोईकडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे सलमान खान मुंबईतील वांद्रे इथेच त्याचं नवं घर बांधण्याच्या तयारीत आहे. तो ‘गॅलेक्सी’पासून काही अंतरावरच सीफेसिंग सहा मजली घर बांधणार आहे, या प्रकल्पाला ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’ची मंजुरी मिळाली आहे. सलमान खाननं ही जमीन आपली आई सलमा खान यांच्या नावानं खरेदी केल्याचीही माहिती समोर आली आहे.

सलमान खानच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं तर, तो लवकरच अपूर्व लाखिया यांच्या ‘मातृभूमी’ सिनेमात झळकणार आहे. याव्यतिरिक्त, तो दाक्षिणात्य सिनेनिर्माते वामशी पैदिपल्ली यांच्या दिग्दर्शनाखालील एका ॲक्शन-थ्रिलर सिनेमातही काम करणार आहे. हा सिनेमा 2027 मध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *