Menu

गिरणी कामगारांच्या घराची सोडत, इथे पाहा निकाल

nobanner

म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे चौथ्या टप्प्यांतर्गत गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात आली. वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात रविवारी सकाळी ११ वाजता ही सोडत काढण्यात आली.

बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांसाठी ही सोडत होती. उद्धव ठाकरेंनी यावेळी गिरणी कामगार व त्यांच्या वारसांकडून मिळालेलं हक्काचं एकही घर विकणार नाही असं वचन घेतलं.

“आज तुमच्यासाठी काही केलं नाही, तर इतिहासात आमची नतद्रष्ट म्हणून नोंद होईल. म्हणूनच हे सगळं करायचं आहे. ही घरं तुमच्यासाठी देतो आहे. तुमच्यामुळे आज आम्ही आहोत. कित्येक लोकांनी बलिदान दिलं आहे. रक्त सांडवून मिळवलेली मुंबई आपली आहे. तिला विकून जाऊ नका” असे उद्धव ठाकरे या प्रसंगी म्हणाले.

मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांमधील गिरणी कामगारांना घरे देण्याच्या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने मुंबई मंडळातर्फे वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत ७२० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. तसेच बॉम्बे डाईंग (स्प्रिंग मिल) येथे २६३० सदनिका आणि लोअर परळ येथील श्रीनिवास मिलच्या जागी ५४४ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील २२५ चौरस फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. तसेच आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात १५ मजल्यांचे वाहनतळ इमारत (पार्किंग टॉवर) उभारण्यात आले आहे

२०१० मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फ त गिरणी कामगारांची माहिती संकलित करण्याकरता विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गिरणी कामगारांकडून एकू ण १ लाख १० हजार ३२३ अर्ज प्राप्त झाले. मृत गिरणी कामगारांच्या वारसांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून २०११ मध्ये पुन्हा गिरणी कामगार वारसांकडून अर्ज मागवण्यात आले. त्यानुसार ३८ हजार ३८८ अर्ज प्राप्त झाले.

आतापर्यंत ८ हजार ४९० जणांना ताबा
यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ६ हजार ९२५ सदनिकांची संगणकीय सोडत २८ जून, २०१३ रोजी काढण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यांतर्गत २६३४ सदनिकांची सोडत ९ जून, २०१६ रोजी काढण्यात आली. तसेच तिसऱ्या टप्प्यांतर्गत एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत (रेंटल हौसिंग स्कीम) प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील (१६० चौ फुटांच्या दोन सदनिका मिळून एक) अशा २ हजार ६३४ जोड सदनिकांची सोडत २ डिसेंबर, २०१६ मध्ये काढण्यात आली. अशा प्रकारे अद्यापपर्यंत मुंबई मंडळातर्फे एकूण ११ हजार ९७६ सदनिकांपैकी ८ हजार ४९० सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला आहे.