उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘कावड यात्रे’दरम्यान होणारी कावड यात्रेकरूंची मोठी गर्दी लक्षात घेता 4 ते 12 ऑगस्ट या कालावधीत शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. अधिकृत घोषणेनुसार, नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार आहेत. महाविद्यालयं, विद्यापीठे आणि इतर संस्थांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील.
30 जुलै 2026 रोजी श्रावण महिना सुरू होत असल्याने, जिल्हा शालेय निरीक्षकांनी अधिकृत परिपत्रकात नमूद केलं आहे की, “जिल्ह्यात 11 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण शिवरात्रीचा मुख्य उत्सव साजरा केला जाईल.” “जिल्ह्यातील विविध मार्गांवर मोठ्या संख्येने यात्रेकरू आणि भाविकांचा प्रवास सुरू झाला आहे,” असंही सांगण्यात आलं आहे.
अधिकृत अधिसूचना
“गाझियाबादच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता, जिल्ह्यातील सर्व शाळा (नर्सरी ते इयत्ता 12 वी पर्यंत), ज्यामध्ये बेसिक एज्युकेशन कौन्सिल, सेकंडरी एज्युकेशन कौन्सिल, सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) व इतर संलग्न मंडळे आणि मदरसा बोर्डाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांचा समावेश आहे, त्या 4 ते 12 ऑगस्ट 2026 या कालावधीत बंद राहतील.”
त्यात पुढे असंही म्हटलं आहे की, “जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं, विद्यापीठे आणि तांत्रिक संस्था (सरकारी व खाजगी विद्यापीठे/खाजगी तांत्रिक संस्थांसह) 4 ते 12 ऑगस्ट या कालावधीत बंद राहतील; मात्र, एखाद्या अभ्यासक्रमाचे किंवा विषयाचे परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच जाहीर झाले असल्यास त्यास ही अट लागू होणार नाही.”
याव्यतिरिक्त, मेरठ जिल्ह्यातही 12 ऑगस्टपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी व्ही. के. सिंग यांनी दिलेल्या आदेशानुसार, सोमवारी मेरठमधील सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि तांत्रिक शिक्षण संस्था बंद होत्या.
उत्तर प्रदेशात कुठे शाळा बंद राहतील?
गाझियाबाद, मेरठ आणि मुझफ्फरनगर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये शाळा बंद राहतील. विद्यार्थी आणि पालकांना आपापल्या जिल्ह्यांसाठीच्या अधिकृत सूचना तपासाव्यात आणि शाळा बंद असल्याबाबतची खात्री करण्यासाठी शाळा प्रशासनाशी संपर्क साधावा असा सल्ला देण्यात आला आहे.
देशातील काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे स्थानिक प्रशासनाला शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली आहे. उत्तर प्रदेशव्यतिरिक्त, 4 ऑगस्ट रोजी आणखी कोणत्या राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असेल? चला जाणून घेऊया.
या राज्यांमध्येही शाळा राहणार बंद
ओडिशामधील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यानंतर, जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील अतिसंवेदनशील भागांत मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केरळ आणि ईशान्येकडील काही राज्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनीही हवामानाची स्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई आणि गुजरातमधील काही भागांतही शाळा बंद राहतील.
