शहरातील राज्य मंडळाशी संलग्न शाळांना दि. २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे. प्राथमिक शाळांची सुट्टी १७ नोव्हेंबरपर्यंत, तर माध्यमिक शाळांची सुट्टी १८ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. एक दिवसाच्या फरकाने प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणार असून, त्यानंतर संकलित चाचणी-१ व सहामाही परीक्षा होणार आहे.
दरवर्षी शाळांना वर्षभरात उन्हाळ्याची व दिवाळीच्या अशा दोन मोठ्या सुट्ट्या मिळतात. यंदा दिवाळीची सुट्टी प्राथमिक शाळांना २ ते १७ नोव्हेंबरदरम्यान म्हणजेच १५ दिवस असणार आहे. तसेच माध्यमिक शाळांना ही सुट्टी २ ते १८ नोव्हेंबर म्हणजेच १६ दिवस असणार आहे. सुट्ट्यांचे नियोजन करताना प्राथमिक व माध्यमिकमध्ये तफावत नसावी, अशी मागणी करण्यात आली होती. तरीही यंदा प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सुट्ट्यांमध्ये एक दिवसाची तफावत आहे.
प्राथमिक शाळा १८ नोव्हेंबरला व माध्यमिक शाळा १९ नोव्हेंबरला भरल्यानंतर शाळांना लगेचच ‘संकलित चाचणी – १’च्या तयारीला लागावे लागणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत संकलित चाचणी – १ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची सूचना देण्यात आली आहे. गणित, इंग्रजी व मराठी या विषयांसाठी संकलित चाचणी, तर अन्य विषयांसाठी शाळास्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर अवघ्या आठवडाभरात शाळांना या परीक्षेचे आयोजन करावे लागेल.
- प्राथमिक शाळा : २ ते ते १७ नोव्हेंबर
- माध्यमिक शाळा : २ ते १८ नोव्हेंबर
सुट्ट्यांमधील तफावत अन् शिक्षकांची मागणी
१ दिवसाची तफावत: दरवर्षीप्रमाणे यंदाही सुट्ट्यांचे नियोजन करताना प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या कालावधीत १ दिवसाचा फरक राहिला आहे. प्राथमिक शाळांना १५ दिवस तर माध्यमिक शाळांना १६ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे.
एकसमान सुट्टीची मागणी: प्राथमिक व माध्यमिक विभागातील ही तफावत दूर करून संपूर्ण राज्यभरात एकाच कालावधीत सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात होती; मात्र यंदाही ही १ दिवसाची तफावत कायम राहिली आहे.
