1,500 ड्रोनचा शो अन् ‘कॉर्डेलिया स्काय’चे शानदार स्वागत
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे ‘कॉर्डेलिया स्काय’च्या स्वागतासाठी खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला व्यावसायिक भागीदार, पाहुणे, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि पर्यटन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण ठरला तो 1,500 ड्रोनचा भव्य शो! संगीत, रोषणाई आणि तंत्रज्ञानाची सांगड घालत ड्रोनच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची झलक आणि नव्या क्रूझची प्रतिमा आकाशात साकारण्यात आली. या अनोख्या सादरीकरणामुळे मुंबईच्या आकाशात एक अविस्मरणीय दृश्य पाहायला मिळाले. कॉर्डेलिया क्रूझचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युर्गेन बेलॉम (Jurgen Bailom) यांनी यावेळी कंपनीच्या प्रवासाबद्दल भावना व्यक्त केल्या. 2021 मध्ये कंपनीची सुरुवात करताना भारतीयांसाठी क्रूझ प्रवास हा सुट्टी घालवण्याचा एक लोकप्रिय पर्याय बनवण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
8 लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास; आता दोन जहाजांचा ताफा
2021 मध्ये सेवा सुरू केल्यापासून कॉर्डेलिया क्रूझने आतापर्यंत 8 लाखांहून अधिक प्रवाशांचे स्वागत केले आहे. आता ‘कॉर्डेलिया स्कायy’च्या समावेशामुळे कंपनीच्या प्रवासी क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. कंपनीच्या दोन्ही जहाजांची क्षमता पाहिली तर आकडेवारीही लक्षवेधी आहे.
- एकूण स्टेटरूम्स: 1,798
- डबल ऑक्युपन्सीनुसार एकूण प्रवासी क्षमता: 3,596 प्रवासी
- पुढील विस्तार: नोव्हेंबर 2027 पर्यंत ‘Cordelia Sun’ दाखल करण्याचे लक्ष्य
नव्या जहाजामुळे कंपनीची प्रवासी क्षमता पूर्वीच्या तुलनेत सुमारे 126 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात अधिक पर्यटकांना क्रूझ प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी मिळू शकते.
‘कॉर्डेलिया स्काय’मध्ये मिळणार लक्झरीसोबत मनोरंजनाची मेजवानी
केवळ समुद्रसफर नव्हे, तर जहाजावरच सुट्टीचा संपूर्ण आनंद घेता यावा, या दृष्टीने ‘कॉर्डेलिया स्काय’ची रचना करण्यात आली आहे. भारतीय प्रवाशांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन येथे विविध सुविधा उपलब्ध असतील.
खाण्यापिण्याचे विविध पर्याय: भारतीय पदार्थांसोबत इटालियन आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येईल. शाकाहारी तसेच जैन प्रवाशांसाठी योग्य भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
मनोरंजन आणि लाइव्ह शो: जहाजावर लाइव्ह परफॉर्मन्स, थिएटर शो आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेता येईल.
फिटनेस आणि वेलनेस: प्रवासादरम्यानही फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी फिटनेस आणि वेलनेस सेंटरची सुविधा असेल.
क्रीडा आणि मुलांसाठी खास जागा: क्रीडा उपक्रमांसोबत लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन प्रवाशांसाठी स्वतंत्र खेळण्याच्या जागा उपलब्ध असतील. म्हणजेच, कुटुंबासोबत सुट्टी घालवायची असो किंवा मित्रांसोबत समुद्राच्या लाटांमध्ये निवांत वेळ अनुभवायचा असो, ‘Cordelia Sky’वर प्रवाशांना अनेक पर्याय मिळणार आहेत.
मुंबई ते गोवा, लक्षद्वीप; परदेशवारीचाही पर्याय!
‘कॉर्डेलिया स्काय’ची पहिली व्यावसायिक क्रूझ सफर 23 ऑक्टोबर 2026 पासून मुंबईहून सुरू होणार आहे. प्रवाशांना कमी कालावधीच्या समुद्रसफरीपासून ते आंतरराष्ट्रीय पर्यटनापर्यंत विविध पर्याय उपलब्ध होतील.
‘कॉर्डेलिया स्काय’चे प्रमुख प्रवासमार्ग
- 2 रात्रींची समुद्रसफर: समुद्राच्या सान्निध्यात निवांत वेळ घालवण्यासाठी शॉर्ट ब्रेक क्रूझ.
- गोवा क्रूझ: 3 रात्रींची गोवा सफर.
- लक्षद्वीप क्रूझ: 4 रात्रींचा लक्षद्वीप प्रवास.
- गोवा आणि लक्षद्वीप: दोन्ही ठिकाणांचा अनुभव देणारी 5 रात्रींची सफर.
- दक्षिण-पूर्व आशिया टूर: चेन्नईहून 7 रात्रींच्या आंतरराष्ट्रीय क्रूझचा पर्याय.
- आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान फुकेत, लांगकावी, क्वालालंपूर आणि सिंगापूर या लोकप्रिय पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भारतातच समुद्रसफरीचा आनंद घेण्यापासून ते परदेशातील लोकप्रिय पर्यटनस्थळे पाहण्यापर्यंत प्रवाशांसमोर अनेक पर्याय असतील.
कोचीही बनणार क्रूझ पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र
मुंबईसोबतच दक्षिण भारतातील प्रवाशांसाठीही कंपनीने महत्त्वाची योजना आखली आहे. ‘Cordelia Sky’ मुंबईत दाखल झाल्यानंतर कंपनीचे पहिले जहाज ‘Cordelia Empress’ कोचीला आपले नवे होमपोर्ट बनवणार आहे. या जहाजाच्या व्यावसायिक फेऱ्या 25 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे केरळ आणि दक्षिण भारतातील पर्यटकांना क्रूझ प्रवासासाठी मुंबईपर्यंत येण्याची गरज कमी होऊ शकते. कोचीहून प्रवाशांना वीकेंड गेटवे, लक्षद्वीपमधील मिनिकॉय आणि कवरत्ती या बेटांचा प्रवास तसेच आंतरराष्ट्रीय क्रूझचे पर्याय उपलब्ध करून देण्याची योजना आहे.
भारतीय क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी गती?
‘’कॉर्डेलिया स्काय’च्या आगमनामुळे भारतीय क्रूझ पर्यटन क्षेत्रात विस्ताराची नवी संधी निर्माण झाली आहे. दोन जहाजांचा ताफा, मुंबई आणि कोची ही दोन होमपोर्ट्स, विविध देशांतर्गत प्रवासमार्ग आणि आंतरराष्ट्रीय सफरींचे पर्याय यामुळे कंपनी अधिक प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच 2027 मध्ये ‘Cordelia Sun’ दाखल करण्याचे नियोजन असल्याने कंपनीच्या विस्ताराकडेही पर्यटकांचे लक्ष लागले आहे.
आता समुद्राच्या लाटांवर लक्झरी, मनोरंजन आणि पर्यटनाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी भारतीय प्रवाशांसमोर आणखी एक आकर्षक पर्याय उपलब्ध होणार आहे!
