महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने म्हणजेच एसटीने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. सवलतीच्या प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्डसंदर्भतील मुदत पुढे ढकलण्यात आली आहे. या कार्डसाठीची सक्तीची तारीख आता 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून कार्ड नसले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना जुन्या पद्धतीने सवलतीचे तिकीट मिळणार आहे.
अडचणींचा सामना
एनसीएमसी कार्ड काढताना सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसह वाहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
मॅन्युअल तिकिटावर सवलत
एनसीएमसी कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर ताण वाढला आहे. यामुळेच एनसीएमसी कार्ड रिचार्ज न होणे किंवा कार्ड रीड न होण्याच्या तक्रारी येत आहेत. तांत्रिक अडचणीमुळे सवलतीचे तिकीट कार्डमधून काढता न आल्यास यापूर्वी 14 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र आता ही सवलत अजून दोन आठवड्यांनी वाढवली आहे.
नोंदणी अन् पावती असेल तरी चालेल
कार्डसाठी नोंदणी आहे; मात्र कार्ड मिळालेले नाही, अशांना पावती दाखवून 30 सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकिटावर सवलत मिळेल असं जाहीर करण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी तासन् तास रांगा लावूनही सर्व्हरच्या अडचणीमुळे कार्ड सक्रीय करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळेच मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलेली. ही मागणी तात्पुरत्या स्वरुपात मान्य करण्यात आली आहे.
रिचार्जसंदर्भात संभ्रम
एनसीएमसी कार्ड प्रणाली सुरू करण्यापूर्वी रिचार्जची यंत्रणा सुरळीत आहे की नाही, याची खातरजमा करणे आवश्यक होतं असा नाराजीचा सूर आता प्रवाशांनी लावला आहे. ग्रामीण भागात अनेक गावांपासून एसटी आगार 30 ते 35 किलोमीटरवर आहेत. अशा परिस्थितीत केवळ रिचार्जसाठी प्रवाशांनी तालुक्याच्या ठिकाणी जाणे शक्य नाही. त्यामुळे वाहकांकडे रिचार्जची सुविधा उपलब्ध करून द्यावी किंवा प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर रिचार्जची सोय करावी अशी मागणी होत आहे. जोपर्यंत रिचार्ज व्यवस्था सुरळीत होत नाही, तोपर्यंत सवलतीसाठी आधार कार्डचा पर्याय कायम ठेवावा, अशी मागणी प्रवासी संघांकडून केली जात आहे. कोणतेही प्रशिक्षण न देता केवळ एका संदेशाद्वारे वाहकांना एनसीएमसी अंमलबजावणीच्या सूचना देणे अत्यंत चुकीचे आहे. दिवसभर कार्ड टॉपअप करताना एरर येणे, मशीन हँग होणे अशा तांत्रिक अडचणींमुळे वाहकांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशा वाहकांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी या कार्डसंदर्भात आहे.
