Headlines

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची हजेरी, हवामान विभागाने दिला 4 आठवड्यांचा अंदाज, तुमच्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार का?

सप्टेंबर महिन्यात पावसाबाबत दिलासादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने राज्यात ओढ दिली होती. त्यामुळं अनेक भागात पावसाची तूट नोंदवली होती. मात्र सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात पावसाने दिलासा दिला आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी पुढील चार आठवड्यांचा अंदाज जारी केला असून, त्यानुसार राज्यात टप्प्याटप्प्याने पाऊस जोर धरणार आहे. तर आज पूर्व विदर्भातील, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

3 ते 10 सप्टेंबर या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 ते 17 सप्टेंबरदरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढेल आणि तिथे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 17 ते 24 सप्टेंबर या काळात मराठवाडा आणि आसपासच्या भागात पावसाचे पुनरागमन होऊन जोरदार सरी कोसळू शकतात.

तर 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबईत 12, 13 सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस अपेक्षित आहे. ओरिसाच्या पट्ट्यालागत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सवात पावसाची अपेक्षा आहे, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.

मध्य प्रदेश आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून 7.6 किमी उंचीपर्यंत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशाकडे येण्याची शक्यता आहे.

आज कुठे इशारा?

आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. धुळे, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि ऊन- सावल्यांचा खेळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *