अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या नव्या हवामान सिस्टिममुळे 23 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात 35 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील. समुद्र प्रचंड खवळलेला राहणार असल्याने मच्छीमार आणि सागरी उपक्रमांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या सिस्टिमचा मुख्य प्रभाव भारताबाहेर इतर समुद्रातच मर्यादित राहील.
नैऋत्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या एका नवीन हवामान सिस्टिममुळे अरबी समुद्रातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. सॅटेलाइटने टिपलेल्या ताज्या माहितीनुसार, या भागात एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील 24 तासांत कमी दाबाचा पट्टा तीव्रमध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र, भारतीय हवामान प्रेमी आणि किनारपट्टीवरील नागरिकांसाठी एक दिलासादायक वृत्त असून या सिस्टिमचा भारतावर कोणताही थेट परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट आहे.
कमी दाबाच्या पट्ट्याची हालचाल
भारतीय हवामान शास्त्रज्ञ आणि सॅटेलाइटच्या निरीक्षणानुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र सध्या नैऋत्य अरबी समुद्रावर केंद्रित आहे. सुरुवातीला ही सिस्टिम पूर्व-ईशान्य दिशेने प्रवास करेल, परंतु त्यानंतर ती आपली दिशा बदलून उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेने ओढली जात सोमालियाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. त्यामुळे या हवामान सिस्टिमचा मुख्य मार्ग हा भारतीय उपखंडापासून दूर जात असल्याने देशात मान्सूनोत्तर पावसाचा मोठा धोका टळला आहे.
जोरदार वारे घोंगावणार
जरी या सिस्टिमचा भारताच्या जमिनी भागावर परिणाम होणार नसला, तरी अरबी समुद्रातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, 23 ऑक्टोबर 2026 पर्यंत नैऋत्य अरबी समुद्र आणि लगतच्या पाण्याच्या क्षेत्रात 35 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने चक्री वारे वाहतील, ज्याचा कमाल वेग 60 किलोमीटर प्रतितास पर्यंत पोहोचू शकतो. या काळात समुद्र प्रचंड खवळलेला राहणार आहे.
सागरी उपक्रमांना सतर्कतेचा इशारा
या तीव्र वारे आणि खवळलेल्या समुद्राच्या परिस्थितीमुळे हवामान खात्याने मच्छीमार, व्यावसायिक जहाजे आणि सागरी वाहतूक करणाऱ्या यंत्रणांना नैऋत्य अरबी समुद्राच्या खोल भागात न जाण्याचा कडक इशारा दिला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत या भागातील सर्व प्रकारच्या सागरी उपक्रमांवर मर्यादा आणण्यात आल्या आहेत, जेणेकरून कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होणार नाही. भारताच्या किनारपट्टीवर केवळ ढगाळ वातावरण राहू शकते, परंतु मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.
