Headlines

हा तर फक्त ट्रेलर! पावसाचा जोर आणखी वाढणार, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

पावसाने मोठी सुट्टी घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस होतोय. संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई शहर व उपनगरातही पाऊस बरसतोय. पण हवामानातील मोठ्या बदलांमुळे आता पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यांवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने या भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, घाटांच्या भागात सर्वत्र व्यापक पाऊस झाला असून, काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस नोंदविला गेला आहे. जुलै महिन्यात मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामानात मोठा बदल झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला.

नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट

नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवार  ते गुरुवार  दरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. तसंच, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आदी घाट परिसरात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. शहरात मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज. 8 ते 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनला बळ मिळत असून उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. घाट परिसरात प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईला पावसाचा यलो अलर्ट

मुंबईला पावसाचा यलो अलर्ट, तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आता मुंबईसह सिंधुदुर्ग कोल्हापूर अहिल्यानगर सांगलीला यलो अलर्ट दिला आहे.  ठाणे रायगड पालघरला अद्याप ऑरेंज अलर्ट असून मुसळधार पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *