Headlines

रायगडमध्ये 8 मुलांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर मोठी कारवाई! पुण्यातील विनर्स अकॅडमी नगरपरिषदेकडून सील

पुण्यातील आळंदी येथून रायगडच्या दिवेआगर येथे सहलीसाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई करण्यात आली आहे. विनर्स अकॅडमीने विद्यार्थ्यांच्या सहलीचं आयोजन केलं होतं. दरम्यान या दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत शहरातील संबंधित कोचिंग क्लासेस व आस्थापनांची पाहणी करण्यात आली आणि त्यानंतर जप्तीची कारवाई केली.

दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीच्या इमारतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान श्री. नारायण हरिभाऊ दस यांच्या मालकीची मालमत्ता क्र. जुना 1137, नवीन LAN00001729 या मिळकतीमध्ये विनर्स अकादमी कोचिंग क्लासेस सुरू असल्याचे निदर्शनास आले.

सदर आस्थापनेने नगरपरिषदेकडून आवश्यक व्यवसाय परवाना/ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याचे नगरपरिषदेच्या अभिलेखावरून निदर्शनास आले नाही. त्यामुळे लागू असलेल्या कायदे व नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार मुख्याधिकारी श्री. माधव खांडेकर यांच्या आदेशानुसार कर विभाग प्रमुख श्रीमती सीमा चारवे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेच्या पथकाने विनर्स अकादमीची सदर मिळकत सील करण्याची कार्यवाही केली. या कार्यवाहीदरम्यान पोलीस प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यवाही ही संबंधित आस्थापनांनी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करावे तसेच नगरपरिषदेकडून लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने करण्यात आली आहे असल्याची माहिती नगरपरिषदेने दिली आहे.

रायगडमध्ये दुर्घटना, आठ मुलं बुडाली

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. आळंदी येथील खासगी अकॅडमीचे विद्यार्थी सहलीसाठी दिवेआगर येथे आले होते. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी आठ जण पाण्यात बुडाले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आळंदी येथील विद्यार्थ्यांची सहल दिवेआगरच्या समुद्रकिनारी आली आणि काही क्षणांतच या आनंदाच्या सहलीचे रूपांतर शोकांतिकेत झाले.मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचा सुमारे 48 जणांचा समूह दिवेआगर येथे आला होता. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता. समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांना पाण्याची खोली आणि समुद्राच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. त्यानंतर ते पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस, प्रशासन तसेच स्थानिक जलक्रीडा कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली

या दुर्घटनेत यश वानखेडे, सोहम भांडवलकर, तन्मय वहिले, कौस्तुभ दौंड, कैवल्य वासनकर, राजवीर वहिले, प्रणव बनसोडे आणि सुमित अहिरे या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे

या दुर्घटनेनंतर दिवेआगरसह रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पुरेसे प्रशिक्षित जीवरक्षक, धोकादायक ठिकाणी स्पष्ट सूचना फलक, समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती आणि पर्यटकांवर प्रभावी देखरेख आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे

दरम्यान, या दुर्घटनेतील नेमकी कारणे आणि सहलीदरम्यान आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याबाबत चौकशीचे निर्देश देण्यात आल्याचे वृत्त आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *