Headlines

खासदाराच्या मुलाने भरधाव कारने तरुणीला उडवलं; मुलीचा जागीच मृत्यू, तरीही अटक नाही, पोलीस म्हणतात ‘हा तर…’

खासदाराच्या मुलाने कारने दिलेल्या धडकेत 26 वर्षीय तरुणीला जीव गमवावा लागला आहे. कार कथितरित्या अत्यंत वेगाने आणि बेदराकरपणे चालवली जात होती. हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ॲस्टन मार्टिन कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर, राज्यसभा सदस्य लिंगमनेनी रमेश यांचा 21 वर्षीय मुलगा लिंगमनेनी संजूश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कथितरीत्या अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवल्याचा आरोप आहे.

मृत तरुणीची ओळख पटली

मृत तरुणीची ओळख पटली असून तिचं नाव भारती मुखी आहे. ती ‘इनऑर्बिट मॉल’मध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत  होती. 16 ऑगस्ट रोजी माधापूर परिसरात कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना या कारची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला.

आरोपी संजूश कोण आहे?

सायबराबाद पोलिसांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख संजुश (21) अशी पटवली आहे. त्याचे वडील हे व्यावसायिक असून ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ‘जन सेना पक्षा’चे खासदार आहेत. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

माधापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी. श्रीधर यांनी सांगितलं आहे की, आरोपीला नोटीस बजावण्यात आली आहे. हा गुन्हा जामीनपात्र असून त्यात जास्तीत जास्त सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असल्याने आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अपघात कसा घडला आणि त्यानंतर काय झाले?

एफआयआरनुसार (FIR), भारती आणि तिची सहकारी पूजा अशोक अलोणे या रविवारी दुपारी ३ च्या सुमारास जेवणासाठी जवळच असलेल्या ‘आयटीसी कोहिनूर’ (ITC Kohenur) परिसराकडे गेल्या होत्या. कामाच्या ठिकाणी परतत असताना, मॉलसमोरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना भारतीला ‘ॲस्टन मार्टिन’ (Aston Martin – TG-09-G-0666) या गाडीने धडक दिली.

या धडकेनंतर भारतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला त्याच कारमधून जुबली हिल्स येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर तिची मैत्रीण पूजाने स्टोअर मॅनेजर अश्विन कुमार यांना याची माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांना कळवले.

एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, भारतीला धडक दिली तेव्हा कार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली जात होती. हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 106(1) अन्वये दाखल करण्यात आला आहे. हे कलम निष्काळजीपणाच्या किंवा बेपर्वाईच्या कृतीमुळे (जी सदोष मनुष्यवधाच्या श्रेणीत येत नाही) मृत्यू ओढवल्याशी संबंधित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *