Headlines

महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी विधानसभेत सरकारची महत्त्वाची घोषणा, विद्यार्था हितासाठी मोठा निर्णय!

राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत. शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग (Sting) ऊर्जा पेयाची विक्री होऊ नये, यासाठी आवश्यक निर्देश जारी करण्यात येतील, असे आश्वासन विधानसभेत देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ऊर्जा पेयांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विधानसभेत सरकारची महत्त्वाची घोषणा

विधानसभेच्या कामकाजादरम्यान आमदार विक्रम पाचपुते यांनी शाळांजवळ स्टिंगसारख्या ऊर्जा पेयांची विक्री सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांनी सरकार या विषयावर सकारात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट केले.

शाळांभोवती 500 मीटर परिसरात विक्री रोखण्याची तयारी

सरकारकडून संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात येणार असून, शाळांच्या 500 मीटर परिसरात स्टिंग पेयाची विक्री होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. यासाठी स्थानिक प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वय साधला जाण्याची शक्यता आहे.

आमदार विक्रम पाचपुते काय म्हणाले?

स्टिंग हे स्वस्त एनर्जी ड्रिंक आहे पण ते शाळकरी मुलांसाठी घातक आहे.स्टिंगमध्ये 34% साखर आणि इतर घटक असतात ज्याचे सेवन लहान मुलांनी करणे योग्य नाही.शासनाने शालेय परिसरात याच्या विक्रीवर बंदी घातल्याचे सरकारने म्हटले आहे. परंतु, केवळ शालेय परिसरात विक्रीवर बंधने न घातला यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य

ऊर्जा पेयांमध्ये कॅफिन आणि साखरेचे प्रमाण तुलनेने अधिक असू शकते. अशा पेयांचे वारंवार सेवन केल्यास विद्यार्थ्यांच्या झोपेवर, एकाग्रतेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे शालेय परिसरात अशा उत्पादनांची सहज उपलब्धता कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पालक आणि शिक्षकांकडून निर्णयाचे स्वागत

शाळांजवळ ऊर्जा पेयांची विक्री मर्यादित करण्याच्या निर्णयाचे अनेक पालक आणि शिक्षकांनी स्वागत केले आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी आणि जंक फूड तसेच ऊर्जा पेयांचे आकर्षण कमी व्हावे, यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

अंमलबजावणीवर सर्वांचे लक्ष

घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात नियमांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शाळांजवळील दुकाने, कँटीन आणि इतर विक्री केंद्रांवर नियमित तपासणी करून नियमांचे पालन सुनिश्चित करणे आवश्यक ठरणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल

सरकारच्या या आश्वासनामुळे शाळा परिसर अधिक सुरक्षित आणि आरोग्यपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, संतुलित आहाराला प्रोत्साहन देणे आणि शाळांभोवती आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे हे या निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *