मुंबईल लोकलमधून प्रवास करताना हत्या झाल्याची घटना काही दिवसांपुर्वी समोर आली होती. यानंतर मुंबईकर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान रेल्वे प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. ज्याचा अनुभव तुम्हाला प्रवासावेळी येणार आहे. मुंबई लोकलमध्ये कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास आता बंदी असणार आहे. काय नेमका निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई लोकलमधून प्रवास करताना धारदार हत्यारे किंवा अवजारे सोबत नेण्यावर निर्बंध घालण्यात आलाय. कामासाठी धारदार अवजारे वापरणाऱ्यांनी ती कामाच्या ठिकाणीच ठेवावीत, असे आवाहन मुंबई रेल्वे पोलिसांनी केलंय. मासळी विक्रेते, बिगारी कामगार आणि इतर काही व्यावसायिकांकडे धारदार अवजारे असतात.मात्र अशी अवजारे लोकल प्रवासादरम्यान सोबत न बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार काही प्रमाणात सवलत देण्याबाबत विचार सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे रेल्वे पोलिसांचे मत आहे.
मालाड आणि बोरिवली हत्या प्रकरणानंतर रेल्वे पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बॅग चेकिंग होणार आहे. एकाचवेळी 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ स्टेशनवर उपस्थित राहणार आहेत. 2 कर्मचारी बॅग चेक करणार आहेत. टर्मिनलवर लगेज तपासणसाठी मशीनचा वापर केला जाणार आहे. यापुढे मुंबई रेल्वे पोलीस अधिक सतर्क राहणार आहेत.
काय घडलं प्रकरण?
चर्चगेट फास्ट लोकलमध्ये प्रवास करताना २२ वर्षीय मयंक लोहार आणि आरोपी रोशन सुवर्णा यांच्यात सुट्ट्या पैशांवरून वाद झाला.वाद झाल्यानंतरही दोघे एकाच लोकलमधून पुढे प्रवास करत होते. तपासात आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही समोर आले आहे.लोकल मालाड–बोरिवली परिसरात पोहोचल्यानंतर पावसाचे पाणी आत येतंय या कारणाने दोघांमध्ये वाद आरोपीने धारदार शस्त्राने मयंकवर हल्ला केला. या हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला. जखमी मयंकला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. रेल्वे पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली असून, हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रमाची अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करत असल्याने, किरकोळ वाद हिंसक स्वरूप धारण करू नयेत यासाठी अधिक कडक सुरक्षा, डब्यांमध्ये वाढीव गस्त आणि प्रभावी देखरेख यंत्रणा उभारण्याची मागणी होत आहे.
रेल्वे सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी
मालाड आणि बोरिवली स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये झालेल्या हत्या प्रकरणामुळे मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. भरधाव लोकलमध्ये घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.प्राथमिक माहितीनुसार, वादातून ही घटना घडल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. नेमके कारण, हत्येची वेळ आणि इतर परिस्थितीचा तपास सुरू असून संबंधित प्रवासी व प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत.मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत डब्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने किरकोळ वादही अनेकदा गंभीर स्वरूप धारण करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई
प्रवासी संघटनांनी प्रत्येक डब्यात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आरपीएफ आणि गव्हर्मेंट रेल्वे पोलीस म्हणजेच जीआरपी जवानांची नियुक्ती, तसेच संवेदनशील स्थानकांवर विशेष गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. तज्ज्ञांच्या मते, अत्याधुनिक निगराणी प्रणाली, आपत्कालीन हेल्पलाइनचा प्रभावी वापर, महिलांसह सर्व प्रवाशांसाठी तातडीची सुरक्षा यंत्रणा आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित कारवाई यामुळे अशा घटना रोखण्यास मदत होऊ शकते.
रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्रवाशांचा विश्वास टिकवण्यासाठी सुरक्षा उपाय अधिक मजबूत करणे, गाड्यांमध्ये नियमित गस्त वाढवणे आणि गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना सुरक्षित आणि विश्वासार्ह लोकल सेवा उपलब्ध करून देणे ही आता प्रशासनाची मोठी जबाबदारी ठरली आहे.
