देश
RBI ने Paytm ला ठोठावला 5.39 कोटींचा दंड! पेटीएम युझर्सवर काय होणार परिणाम?
भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआय देशातील सर्व आर्थिक व्यवहार करणाऱ्या बँका आणि संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवते. कोणतीही बँक आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन करते तेव्हा त्याविरोधात ही केंद्रीय बँक कारवाई करते. अनेकदा ही कारवाई दंडात्मक असते तर कधीकधी धोरणात्मक कारवाईही आरबीआयकडून केली जाते. अशीच एक कारवाई भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएमच्या पेमेंट्स बँक लिमिटेडविरोधात कठोर कारवाई केली आहे. ग्राहकांच्या केव्हायसीसंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने पेटीएमला 5.39 कोटींचा दंड ठोठावला आहे.
ऑडिटर्सकडून करण्यात आला तपास
आरबीआयने पेमेंट्स बँकांना परवाना देण्यासाठी काही नियमावली तयार केली आहे. बँकांनी सायबर सुरक्षासंदर्भातील नियोजन, यूपीआय इकोसिस्टीमसहीत मोबाईल बँकिंग अॅप्स सुरक्षित करण्यासाठी काही नियमांचा यामध्ये समावेश आहे. याच नियमांचं पालन पेटीएमने केलं नसल्याचं आढळून आलं. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या केव्हायसी तसेच एएमएल (अॅण्टी मनी लॉन्ड्रींग) संदर्भातून तपास करण्यात आला. आरबीआयने प्रमाणित केलेल्या ऑडिटर्सने यासंदर्भात सविस्तर ऑडिट केलं.
नेमकी गडबड काय झाली?
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँकेने पेआऊट ट्रानझॅक्शन्सवर लक्ष ठेवलं नाही असं समोर आलं. पेआऊट सेवेचा लाभ घेणाऱ्या संस्थांचं रिस्क प्रोफायलिंग करण्यात आलं नव्हतं अशी माहितीही तपासामध्ये समोर आली. केंद्रीय बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेची पेआऊट सेवांचा लाभ घेणाऱ्या काही ग्राहकांच्या अॅडव्हान्स अकाऊंट्समध्ये दिवसाच्या शेवटी बॅलेन्स मेन्टेन ठेवण्याच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं.