अपराध समाचार
मुलांचा ताबा न मिळण्याच्या भीतीतून नवऱ्याचा बायकोवर चाकूने हल्ला
- 135 Views
- October 04, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- 0 Comments
- Edit
आपल्याला मुलांचा ताबा मिळेल की नाही या भीतीतून इम्रान खान या ३५ वर्षीय व्यक्तिने त्याची पत्नी सोनोबरवर हल्ला चढवला. त्याने तिच्या चेहऱ्यावरही वार केले, ज्यामुळे सोनोबरच्या चेहऱ्याला आणि मानेला मोठी इजा झाली. मीरा रोड भागात ही घटना घडली. सोनोबरला सध्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. ती तिच्या वडिलांसोबत चालली होती त्यावेळी अचानक तिच्या नवऱ्याने तिच्यावर चाकू हल्ला केला. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेत सोनोबरचा जबाब नोंदवून घेण्यात आलेला नाही, त्याचमुळे कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास सोनोबर आणि मी नया नगर या बाजाराच्या ठिकाणी आलो होतो, त्यावेळी अचानक इम्रान आला आणि त्याने सोनोबरवर हल्ला केला, तिला चाकूने भोसकले, तिच्या चेहऱ्यावर वार केले तिला वाचवत असताना मलाही इजा झाली असा आरोप सोनोबरचे ७२ वर्षीय वडिल गुलाम रसूल यांनी केला.
इम्रान खान आणि सोनोबर या दोघांचे लग्न २००७ मध्ये झाले. या दोघांनाही दोन मुले आहेत. मात्र या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत असल्याने त्यांनी वर्षभरापूर्वी ठाणे कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. मुलांचा ताबा आपल्याला मिळणार नाही याच भीतीमधून इम्रानने सोनोबरवर हल्ला चढवला असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. मंगळवारी झालेल्या हल्ल्यात गुलाम रसूल यांनाही इजा झाली.
गुलाम रसूल आणि सोनोबर या दोघांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याची आम्ही वाट बघतो आहोत, त्यानंतर या दोघांचा जबाब आम्ही नोंदवून घेऊ अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप यांनी दिली. एवढेच नाही तर या दोघांवर जो हल्ला झाला आहे त्यावरील वैद्यकीय अहवालाचीही वाट आम्ही बघतो आहोत. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आम्हाला त्यानंतर नोंदवता येईल असेही सानप यांनी स्पष्ट केले.