शुक्रवार ४ एप्रिल २०१४ ऑनलाइन टीम नवी दिल्ली, दि. ४ – बाबरी मशीद पाडण्याचा घटनाक्रम हा पूर्वनियोजीतच होता. या कटात विश्व हिंदू परिषद, शिवसेनेनेही सक्रीय सहभाग घेतला होता असा गौप्यस्फोट एका स्टिंग ऑपरेशनमधून करण्यात आला आहे. बाबरी मशीद पाडणार असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना होती असे या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट झाले आहे. बाबरी मशीद पाडून सुमारे २२ वर्ष लोटले असून नियंत्रण सुटलेल्या जमावानेच ही मशीद पाडल्याचा दावा यापूर्वी केला जात होता. रामजन्म भूमी आदोलनात प्रमूख भूमिका बजावणारे साक्षी महाराज, आचार्य धर्मेंद्र, महंत रामविलास वेदांती, उमा भारती आणि विनय कटियार या नेत्यांचे कोब्रा पोस्टने स्टिंग ऑपरेशन केले आहे. ऑपरेशन रामजन्मभूमी या नावाने हे स्टिंग शुक्रवारी जाहीर करण्यात आले. रामविलास वेदांती, लालकृष्ण आडवाणी अशा अनेक नेत्यांनी बाबरी मशीद पाडण्याचा संकल्प केला होता असे या स्टिंगमध्ये म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदने या हल्ल्यासाठी १२०० कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार केली होती.