देश
“पंतप्रधान अभिनयनिपुण, कधी कोणती नाट्यछटा सादर करतील याचा नेम नाही”
- 46 Views
- March 04, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटनंतर ते सोशल मीडिया सोडतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु मंगळवारी पुन्हा त्यांच्या एका ट्विटनंतर सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. यावरून आता शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी हे सोशल मीडियाचा त्याग करीत आहेत काय? असा प्रश्न मोदींच्या पहिल्या ट्विटनंतर जरूर निर्माण झाला. तथापि याच हत्याराला मोदींनी नाट्यमय धार लावली हे दुसऱ्या ट्विटमधून पुढे आले. मोदी यांची ही नाट्यछटा काही तास देशभरात रंगली. शेवटी सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिनयनिपुण आहेत, असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.
मंगळवारी दुसरं ट्विट करून ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. यावरून शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर आणि पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. शेवटी सोशल मीडियाचे व्यासपीठ हाच भाजपचा ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजनची ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच! आपण सोशल मीडिया सोडणार नाही हे आता मोदींनीच स्वयंस्पष्ट केल्यामुळे भाजपच्या सायबर फौजांचे काय होणार? हा प्रश्नही निकाली निघाला आहे. काही तासांच्या अफवांनी या फौजांचा प्राण जरूर तळमळला असेल, पण फौजेला आता नवे काम मिळाले आहे. आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटय़छटा सादर करतील याचा नेम नाही. असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात ?
आपले पंतप्रधान मोदी हे अभिनयनिपुण आहेत. त्यामुळे ते कधी कोणती नाटय़छटा सादर करतील याचा नेम नाही. मोदी यांनी लागोपाठ दोन दिवसांत केलेल्या दोन वेगवेगळय़ा ट्विटमुळे असेच नाटय़ निर्माण झाले. पण नंतर हा सस्पेन्स खुद्द मोदींनीच संपुष्टात आणला. मोदी यांनी सोमवारी अचानक जाहीर केले की, ‘‘सोच रहा हूं इस रविवार से सोशल मीडिया छोड दूं!’’ सोशल मीडिया म्हणजे समाजमाध्यमांचा त्याग करण्याच्या त्यांच्या घोषणेने मोदीभक्तांच्या छातीत कळा वगैरे आल्या. पण काही तासांच्या या वेदना मोदींच्या दुसऱया ट्विटनंतर कमी झाल्या.
लोक राजकारणातून संन्यास घेतात, कामधंद्यातून बाजूला होतात, पडद्यावरून आणि रंगमंचावरून नट मंडळी तिसरी घंटा वाजवीत एक्झिट घेतात, पण आपले पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरूनच स्वतःला दूर करण्याचे सूतोवाच केल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. मात्र बुचकळय़ात टाकणाऱया या नाटकाचा ‘अंक दुसरा, प्रवेश दुसरा’ मंगळवारी समोर आला आणि या नाटय़ावर पडदा पडला. वास्तविक ‘सोशल मीडिया’ हा तर भारतीय जनता पक्षाचा पंचप्राणच! २०१४ चा लोकसभा रणसंग्राम भाजपने सोशल मीडियावर सायबर युद्ध करूनच जिंकला. गोबेल्स नीतीचा वापर त्या वेळी झाला व काँग्रेस राजकीय पटलावरून अदृश्य झाली.
सोशल मीडियाचा वापर म्हणजे नशापाणी नसले तरी त्याची एक धुंदी आणि अंमल असतोच. ती धुंदी इतक्या सहजासहजी सुटणे कठीणच. मोदींच्या दोन्ही ट्विटवरून आता सोशल मीडियातही विनोदनिर्मिती सुरू झाली आहे. ‘मोदी एकवेळ पंतप्रधानपद सोडतील, पण सोशल मीडिया नाही’ अशी मल्लीनाथी आता सुरू आहे. यातील गमतीचा भाग सोडला तरी इतके ‘फॅन फॉलोइंग’ सोडून मोदींनी सोशल मीडियातून संन्यास घेणे म्हणजे भांडवलशहा अमेरिकेने कम्युनिस्टांचा साम्यवाद स्वीकारण्यासारखेच होते!