खेल
नवोदित फलंदाजांनी हेलिकॉप्टर शॉट खेळू नये, धोनीचा स्ट्रेट ड्राईव्ह
- 113 Views
- November 13, 2017
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
महेंद्रसिंह धोनी भारतीय संघातील नव्या चेहऱ्यांची पारख करणारा कर्णधार म्हणून ओळखला जातो. कर्णधारपद सोडल्यानंतर आजही मैदानात तो आपल्या सहकाऱ्यांना सल्ला देताना पाहायला मिळते. आता त्याने नव्या क्रीडा व्यासपीठावरुन युवा खेळाडूंसाठी एक मोलाचा सल्ला दिलाय. कोणत्याही फलंदाजाने हेलिकॉफ्टर शॉट खेळू नये, असे धोनीनं म्हटलं आहे. हा फटका खेळताना दुखापत होण्याची शक्यता असते, त्यामुळे युवा फलंदाजांनी हा स्ट्रोक शिकण्याचा अट्टाहास करु नये, असे स्पष्टीकरण देखील त्यानं दिलं.
धोनीनं आपल्या जागतिक दर्जाच्या अकादमीच्या माध्यमातून एक नवी इनिंग सुरु केली. दुबईत त्याने पॅसिफिक वेंचर्स या कंपनीसोबत मिळून ‘द महेंद्रसिंह धोनी’ या नावाने पहिली अकादमी उभारली. या अकादमीच्या उद्घाटनानंतर धोनीने युवा क्रिकेटपटूंशी संवाद साधला. त्यावेळी त्याने नवोदित खेळाडूंना मौल्यवान टिप्स दिल्या.
युवा खेळाडूंनी लोकप्रिय हेलिकॉप्टर शॉटचे अनुकरण करु नये, असे म्हटले. तो म्हणाला की, टेनिस चेंडूवर सराव करताना हा शॉट शिकलो. हा शॉट खेळणे खूप कठीण आहे. टेनिस चेंडू बॅटच्या खालच्या बाजूला लागला तरी ताकदीच्या जोरावर तो लांबपर्यंत टोलवणे शक्य असते. मात्र, लेदर चेंडूवर यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागते. हा स्ट्रोक खेळताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही युवा फलंदाजाने या स्ट्रोकवर अधिक मेहनत घेणे उचित वाटत नाही, असे तो म्हणाला.
धोनीनं ९० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर कसोटीतून निवृत्ती घेतली. सध्या तो एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करतो. ३०९ एकदिवसीय सामन्यात धोनीनं आतापर्यंत २१३ षटकार आणि टी-२० मध्ये ८३ सामन्यात तब्बल ४० षटकार खेचले आहेत. या उत्तुंग फटकेबाजीत अनेकदा त्याने हॅलिकॉप्टर शॉटने क्रिकेट चाहत्यांना आनंद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.