देश
जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत – उद्धव ठाकरे
- 65 Views
- March 04, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुस्तक लिहिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं कौतूक केलं. आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी जो विषय आपल्याला कळत नाही त्यावर तारे तोडू नयेत असं म्हणत जास्त बोलणं टाळलं. मराठीत कदाचित पहिल्यांदा पुस्तक लिहिलं गेलं असेल असं सांगताना हे पुस्तक सर्वात आधी मीच वाचणार आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“अर्थसंकल्प म्हणजे फक्त आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. सगळ्या योजनांना अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाला अर्थ असला पाहिजे. अर्थाशिवाय संकल्प आणि संकल्पाशिवाय अर्थ असू शकत नाही. पण हा इतका मोठा देश आणि राज्य चालवत असताना नेमकं करायचं काय असा मोठा प्रश्न असतो,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“आपण जो अर्थसंकल्प मांडतो, तो सगळा पैसा सर्वसामान्यांचा असतो. सर्वसामान्याला कळलं पाहिजे माझ्या पैशाचा वापर कसा करत आहात. मी कर भरतोय त्याचा माझ्यासाठी काय उपयोग केला जात आहे. काय कमी होणार, वाढणार आहे हे सर्वसामान्यांना कळलं पाहिजे,” असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलं.
“अर्थसंकल्पात छोट्या गोष्टींचा उल्लेख असावा लागतो ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. अगरबत्ती स्वस्त होणार, माचीस महागणार वैगेरे. अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारी प्रत्येक गोष्ट अर्थसंकल्पात मांडली पाहिजे अशी प्रथा आहे. मग माझ्या डोक्यात नेहमी विचार येतो की, इतक्या बारीक गोष्ट मांडत असू तर मग नोटबंदी हा विषय अर्थसंकल्पात येणं गरजेचं होतं की नव्हतं ? ज्याच्यावर अर्थव्यवस्था चालते त्या नोटा रद्द करुन नव्या आणल्या याबद्दल सांगायला हवं होतं,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
“एक चांगलं झालं तुम्ही आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं आहे. पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा. आम्हालाही नेमक्या उणीवा काय राहिल्या आहेत हे कळेल,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.