आमच्या जमिनी संपादित करून सुनियोजित नवी मुंबई शहर वसविले, पण सिडको व महापालिकेने मूळ गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. नवी मुंबईत आमची गावे आहेत पण गावांत नवी मुंबई आहे कुठे? अशी खंत सारसोळे, कुकशेत, नेरुळ गावातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. नियोजनाअभावी गावे उभी-आडवी हवी तशा वाढत गेली असून अरुंद रस्ते, दैनंदिन बाजारांचा अभाव, फेरीवाल्यांचा विळखा व वाहतूक कोंडी या समस्यांमुळे गावांत नवी मुंबईचा विकास पोहचला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
नवी मुंबई शहर येथील मूळ गावांच्या जमिनी संपादित करून सिडकोने उभारले. पण पन्नास वर्षांनंतरही नवी मुंबई महापालिका हद्दीत असलेल्या २९ गावांतील अवस्था आजही गावे अशीच आहे. तेथे नवी मुंबई शहराचा सुनियोजित विकास पोहचला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
नेरुळ पश्चिम विभागात प्रभाग क्रमांक ८५, ८६,८७,९३,९४,९५,९६,९७ चा समावेश होत असून सर्वच ठिकाणी फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर आहे. नेरुळ स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात फेरीवाल्यांची मोठी संख्या आहे. सकाळी व रात्रीच्यावेळी स्थानक परिसर हा फेरीवाल्यांनीच गजबजलेला असतो. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारच त्यांनी अडवलेले असते. याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो.
या प्रभागांत वाहतुकीचीही मोठी समस्या आहे. पालिकेचे पार्किंगचे धोरण नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. सारसोळे ते सेक्टर १६ ,१८ पर्यंत नवी मुंबईतील पहिला सायकल ट्रॅक पालिकेने केला आहे, मात्र यावरही वाहने पार्किंग केलेली असतात. काही प्रभागांमध्ये खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांनी खेळायचे कुठे असाही प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे. अनेक प्रभागांमध्ये उद्यानांत रात्रीच्यावेळी बेकायदा धंदे सुरू असतात, ते कधी थांबणार असा सवालही होत आहे. सिडकोनिर्मित घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे.
प्रभागांच्या समस्या दैनंदिन बाजाराचे काम अर्धवट
प्रभाग क्रमाक ८५ मध्ये कुकशेत गाव व सेक्टर ६ चा परिसर येतो. कुकशेतसाठी एमआयडीसीकडून प्राप्त झालेल्या १६ पैकी १३ भूखंडावर विविध समाजोपयोगी कामे करण्यात आली आहेत. शाळा, मैदाने, सायकल ट्रॅक, नेरुळ विभाग कार्यालय, आरोग्यकेंद्र ,व्यायामशाळा यासह अनेक कामे झाली आहेत. या ठिकाणी दैनंदिन बाजाराचे नियोजन मात्र प्रत्यक्षात उतरले नाही.
पार्किंगचा प्रश्न
प्रभाग क्रमांक ८६ सारसोळे गावच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. शाळा तसेच सभागृहासाठी तरतूद करण्यात आली असून बहुउद्देशीय इमारत, रस्ते, प्रवेशद्वार ही कामे करण्यात आली आहेत.
खेळायला मैदान नाही
प्रभाग क्रमांक ८७ मध्ये सेक्टर ८ व १० चा परिसर येत असून रेल्वेमार्गावरील पादचारी पुल, राजश्री शाहू महाराज उद्यान, प्रभागात स्वखर्चाने लावलेले सीसीटीव्ही यासह पदपथ व गटारांची कामे झालेली आहेत. मात्र खेळासाठी विभागात मैदान नाही. शाळेच्या मैदानात सुविधा करून देण्याची मागणी होत आहे. सेक्टर ८, १० परिसरात खेळाचे मैदान नाही.
बाजार नसल्याने फेरीवाल्यांचा प्रश्न
प्रभाग क्रमांक ९३ मध्ये नेरुळ गाव व सेक्टर १०चा परिसर येत असून प्रभागात स्मशानभूमी, आरोग्यकेंद्र, बालवाडी, शाळा रस्ते आदी कामे झाली आहेत. मात्र बाजारासाठी नियोजन नसल्याने फेरीवल्यांचा प्रश्न आहे.
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग
प्रभाग क्रमांक ९४ मध्ये नेरुळ सेक्टर १० चा परिसर येतो. या प्रभागात रस्ते,पदपथ, दिशादर्शक फलक यांसह मलनिस्सारण वाहिन्या व उद्यान सुशोभीकरण ही कामे झाली आहेत. या ठिकाणी पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. जागा मिळेल तशी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.
सिडकोनिर्मित घरांची पुनर्बांधणी प्रलंबित
प्रभाग क्रमांक ९८ मध्ये सेक्टर १८ अ,२०,२४ चा भाग येत असून विविध विकास कामे झाली आहेत. सभामंडप, तलावाचे सुशोभीकरण,आरोग्यकेंद्र, बहुउद्देशीय इमारत यांची कामे झाली आहेत. मात्र सिडकोकालीन इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
अरुंद रस्ते
प्रभाग क्रमांक ९५ मध्ये नेरुळ गाव, सेक्टर २०चा परिसर येतो. प्रभागात गावातील दोन आळ्या जोडण्यासाठी सुविधा, भूमिगत वीजवाहिन्या, पदपथ, रस्ते आदी कामे झाली आहेत. पंडित रामा भगत उद्यानामुळे विरंगुळ्यासाठी जागही झाली आहे. परंतु गावात अरुंद रस्ते असल्यामुळे पार्किंगचा प्रश्न आहे. फेरीवाल्यांचाही प्रश्न आहे.
पोलीस चौकीची मागणी
प्रभाग क्रमांक ९६ मध्ये सेक्टर १६, १६ अ, १८ असे विभाग येतात. या प्रभागात गटारे,उद्याने, बाजार, अभ्यासिका, ग्रथालय व एलईडी वीज व्यवस्था केली आहे. या प्रभागात स्वतंत्र बीट पोलीस चौकीची मागणी मात्र प्रलंबित आहे.
इच्छुकांची संख्या अधिक
पालिका प्रभाग आरक्षणात अनेक महिला नगरसेवकांचे प्रभाग बदलले आहेत, तर नामदेव भगत, गिरीश म्हात्रे, काशिनाथ पवार यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणी घरातील महिलेलाच संधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीमुळे एकाच प्रभागात तीनही पक्षांचे इच्छुक आहेत. एका पक्षाच्या उमेदवाराला तिकीट मिळाले तरी इतर इच्छुक कशी मदत करतील यावर उमेदवारांचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
छत्रपती शाहू महाराज उद्यान विरंगुळा केंद्र
नेरुळ सेक्टर ८ येथील उच्चविद्युत वाहिन्यांखाली झालेले छत्रपती शाहू महाराज उद्यानाचा अनेकांना फायदा होत आहे. पामबीच समांतर मार्गाला शहरातील पहिला सायकल ट्रॅक सकाळच्यावेळी गजबजलेला असतो. नेरुळ प्रभागात झालेली स्मशानभूमी तसेच विविध कामे तर कुकशेत, सारसोळे गावात झालेली विकासकामांबाबत ग्रामस्थ समाधानी आहेत.
विद्यमान नगरसेवक
- प्रभाग क्रमांक ८५ : सुजाता सुरज पाटील (भाजप)
- प्रभाग क्रमांक ८६ : जयश्री एकनाथ ठाकूर (भाजप)
- प्रभाग क्रमांक ८७ : सुनीता रतन मांडवे (शिवसेना)
- प्रभाग क्रमांक ९३ : नामदेव रामा भगत (शिवसेना)
- प्रभाग क्रमांक ९४ : श्रद्धा साजुराम गवस (भाजप)
- प्रभाग क्रमांक ९५ : गिरीश कान्हा म्हात्रे (भाजप)
- प्रभाग क्रमांक ९६ : रुपाली किस्मत भगत (भाजप)
- प्रभाग क्रमांक ९७ : काशिनाथ वामन पवार (शिवसेना)
नेरुळ हे शहरातील मोठे उपनगर असून रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. सेक्टर ८, १० मध्ये खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नाही. तेरणा शाळेचे मैदान शाळेच्या वेळेव्यतिरिक्त उपलब्ध करावे.
-सागर सुर्वे, नेरुळ
नवी मुंबई सुनियोजित शहर आहे. या ठिकाणी विविध चांगल्या गोष्टी आहेत. सारसोळेपासून वजराणी चौकादरम्यान पामबीचला समांतर रस्त्यावर सायकल ट्रॅक झाल्याने चांगली व्यवस्था झाली आहे. मात्र या ट्रॅकवरच वाहने उभी केली जात आहेत.
-सोहम मिसाळ, विद्यार्थी,नेरुळ
नेरुळ रेल्वेस्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांची मोठी अडचण होत आहे. फेरीवाल्यांनी पदपथंसह काही रस्तेही अडविले आहेत. स्टेशनच्या प्रवेशद्वारही त्यांनी अडविले आहे. त्यांना योग्य ठिकाणी जागा करून दिली पाहिजे.
-महेश शिंदे, नेरुळ
नेरुळ स्थानकातून बाहेर पडताना नेरुळ पश्चिम भागात स्थानकातच असलेल्या विविध दुकानांमध्ये दारुविक्रीची दुकाने आहेत. त्यामुळे तिथे दारु घेऊन रस्त्यातच दारू पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. महिलांना जाता येता याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. याबाबत पालिका, पोलीस व सिडको यांनी योग्य उपाययोजना करायला हवी.