अपराध समाचार
खासदार उदयनराजे यांना अखेर अटक
- 135 Views
- July 25, 2017
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- 0 Comments
- Edit
साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांना अखेर अटक झाली आहे. खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच फेटाळला होता. आज त्यांनी आज सातारा शहर पोलिस स्टेशनला हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली.
त्यामुळे उदयनराजे पोलिस ठाण्यात हजर राहणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली.
दरम्यान, वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं असून कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
दुसरीकडे, उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे.
काय आहे प्रकरण?
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.
उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं.
दरम्यान, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.
संभाजी भिडे गुरुजींचा इशारा
“खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठी चाललेले प्रयत्न थांबवावेत. उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चिड निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ”, असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला.
“उदयनराजेंवर केलेले आरोप घाणेरडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं. उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही. त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करु नये”, असंही ते म्हणाले.