खेल
कुलदीप यादवच्या पाठिवर सचिन तेंडुलकरचा हात
- 185 Views
- July 23, 2018
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
कुलदीप यादव हा डावखुरा फिरकी गोलंदाज अत्यंत उपयुक्त असून इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याचा नक्की फायदा होईल अशा शब्दांमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुलदीपला पाठिंबा दर्शवला आहे. ज्यो रूटसह इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कुलदीप कामाला येईल असा विश्वास सचिननं व्यक्त केला आहे.
इंग्लंडच्या समोर एकदिवसीय सामन्यांत खेळताना कुलदीपनं दोन सामन्यांमध्ये 9 गडी बाद केले. एका सामन्यात तर त्यानं 25 धावांमध्ये 6 बळी घेत आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. भारतानं टी-20 मालिकेत इंग्लंडचा 2-1 असा पराभव केला यामध्येही कुलदीपचा वाटा मोलाचा होता. त्याची फिरकी, चायनामन व चेंडूच्या वेगात बदल करायची क्षमता यामुळे इंग्लंडचे फलंदाज अनेकवेळा चकल्याचे बघायला मिळाले आहे.
अर्थात, कुलदीप हा कसोटी सामन्यांसाठीही सक्षम असून प्रतिस्पर्ध्यांसाठी तो एक चांगलं आव्हान उभं करू शकतो असं मत सचिननं व्यक्त केलं आहे. कुलदीपच्या वैविध्यापुढे इंग्लंडचे फलंदाज निष्प्रभ झाल्यासारखे वाटले होते. मात्र अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मात्र त्यांनी कुलदीप यादवची गोलंदाजी चांगली खेळल्याचेही सचिन म्हणाला. या सामन्यात कुलदीपनं 55 धावा दिल्या परंतु त्याला एकही बळी मिळवता आला नाही. परंतु आत्तापर्यंत खेळलेले दोन्ही कसोटी सामने भारतात असलेला कुलदीप इंग्लंडमध्येही चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास सचिननं व्यक्त केला आहे.
अश्विन व जाडेजा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोलंदाज संघात असून खेळपट्टी कशा स्वरुपाची असेल यावर किती फिरकीपटू संघात खेळवायचे याचा निर्णय घेतला जाईल. परंतु जर खेळपट्टी फिरकीला पोषक असेल तर कुलदीपला संधी देण्यात येईल अशी शक्यता आहे. सध्याचा भारतीय संघ समतोल असल्याचे सांगताना बॉलर बॅटिंग करू शकतात व गरज पडली तर बॅट्समन बोलिंग करू शकतात असा समतोल संघ सध्या असल्याचे सचिननं म्हटलं आहे. बुमराह, भुवनेश्वर व वृद्धीमा साहा दुखापतींमुळे पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. परंतु श्रीनाथ, प्रसाद व कुंबळे हा मुख्य गोलंदाजीचा कणा संघात नसताना आम्ही एकदा पाकिस्तानला 4-1 हरवल्याची आठवण सचिननं करून दिली आणि भारताला विजयाची चांगली संधी असल्याचे सांगितले.