देश
एअर इंडियानंतर आणखी एका सरकारी कंपनीच होणार खाजगीकरण
- 43 Views
- March 08, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
सरकारी वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झालेली असताना केंद्रानं आणखी एका सरकारी कंपनीचं खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील सर्व सरकारी हिस्सेदारी विकण्याची घोषणा केंद्रानं केली आहे.
केंद्र सरकारनं जास्तीत जास्त निर्गुतंवणुकीचं धोरण स्वीकारलं आहे. त्यासाठी उद्दिष्ट निर्धारित केलं असून, यापूर्वीचं कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण करण्याला केंद्रानं मंजूरी दिली आहे. आता एअर इंडिया पाठोपाठ भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील संपूर्ण समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदाही मागविल्या आहेत.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये (बीपीसीएल) सरकारचा ५२.९८ टक्के हिस्सा आहे. सरकारकडून करण्यात येणारी सर्वात मोठी निर्गुंतवणूक ठरणार आहे. गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता विभागानं निविदा जाहीर केली आहे. कंपनीतील सर्व भागभांडवल व कंपनीचे व्यवस्थापकीय नियंत्रणही खाजगी उद्योगांकडे दिलं जाणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या भागभांडवलाची किंमत सध्या ११४.९८ कोटी आहे.
नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमध्ये बीपीसीएलचे ६१.५५ टक्के भागभांडवल आहे. या बोलीतून केंद्रानं त्याला वगळलं आहे. नुमालीगड रिफायनरी सरकारी तेल आणि गॅस कंपनीला विकण्यात येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बीपीसीएलची निविदा प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार असून, पहिला टप्पा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट असेल. ज्यात कंपन्या बोलीसाठी निवडल्या जातील, दुसऱ्या टप्प्यात बोली लावली जाईल. सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही कंपनीला बोलीसाठी निविदा भरता येणार नाही. १० अब्ज अमेरिकन डॉलर मूल्य असलेली खाजगी कंपनीच यासाठी पात्र असणार आहे, यासारख्या अटी निविदेमध्ये टाकण्यात आल्या आहेत.