खेल
आजच्या दिवशी स्वतंत्र भारताने जिंकलं होतं हॉकीचं पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक
- 125 Views
- August 12, 2019
- By admin
- in खेल, समाचार
- 0 Comments
- Edit
१२ ऑगस्ट हा दिवस भारतीय हॉकी संघासाठी महत्वाचा दिवस मानला जातो. आजच्या दिवशी ७१ वर्षांपूर्वी स्वतंत्र भारताने हॉकीमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं. १९४८ आधी भारतीय संघाने १९२८, १९३२ आणि १९३६ अशा ३ ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवली होती, मात्र त्यावेळी भारतावर ब्रिटीशांचं राज्य होतं. १५ ऑगस्ट १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३६२ दिवसांनी भारतीय संघाने लंडनच्या वेम्बली मैदानावर सुवर्णपदकाची कमाई केली.
१९४८ साली भारताने साखळी फेरीत अर्जेंटिनाचा ९-१, ऑस्ट्रियाचा ८-० तर स्पेनचा २-० ने पराभव केला होता. यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघाने नेदरलँड्स वर २-१ ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत भारतीय संघासमोर ब्रिटनचं आव्हान होतं. या सामन्यातही भारतीय संघाने धडाकेबाज खेळी करत ४-० ने बाजी मारत सुवर्णपदकाची कमाई केली.
ब्रिटीशांपासून मिळालेलं स्वातंत्र्य, पाकिस्तानच्या निर्मितीमुळे देशातला वाढता तणाव या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी संघाने केलेल्या या कामगिरीला त्या काळी विशेष महत्व प्राप्त झालं होतं. बॉलिवूडनेही भारतीय संघाच्या या कामगिरीची दखल घेतली. २०१८ साली १५ ऑगस्टला अक्षय कुमारची प्रमूख भूमिका असलेला ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.