देश
अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनी दुरुस्तीला यश
- 64 Views
- February 04, 2020
- By admin
- in देश, समाचार
- 0 Comments
- Edit
मेट्रोच्या कामादरम्यान फुटलेली जलवाहिनी तब्बल ३० फूट खोल असल्याने, आधी जलवाहिनीच्या आत शिरून, नंतर पुढे भगदाडापर्यंत दीडशे फूट आत चालत जाऊन मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीचे काम करावे लागले. महापालिकेच्या जल विभागातील ३० ते ३५ अधिकारी- अभियंते- कर्मचाऱ्यांनी सुमारे ४८ तास अथक मेहनत करून ७२ इंचांच्या (सहा फूट व्यास) भरणा जलवाहिनीला पडलेले भगदाड बुजविले. या अथक प्रयत्नांमुळे रविवारपासून आजूबाजूच्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात पालिकेला यश आले.
‘मेट्रो-६’साठी खोदकाम सुरू असताना उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या वेरावली जलाशय २ आणि ३ला भरणा करणारी जलवाहिनी गेल्या आठवडय़ात बुधवारी सायंकाळी विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) येथील हिल क्रिस्ट इमारतीजवळ फुटली. वेरावली जलाशय २ आणि ३ चा पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे पश्चिम उपनगरांमधील वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, पूर्व उपनगरांमधील घाटकोपर, कुर्ला आदी परिसरातील पाणीपुरवठय़ावर परिणाम झाला. तीन दिवस तब्बल २० ते २२ लाख नागरिकांचे पाण्याविना हाल झाले. रस्ता खोदून दुरुस्तीचे काम करणे शक्य नसल्याने ३० फूट खोल असलेल्या जलवाहिनीत शिरून कर्मचाऱ्यांना काम करावे लागले.
ही भरणा जलवाहिनी रस्त्यापासून सुमारे ३० फूट खोल आहे. जलवाहिनीच्या आसपासच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर झोपडय़ा असल्यामुळे खोदकाम करून भरणा जलवाहिनीपर्यंत पोहोचणे अशक्य बनले होते. दरम्यानच्या काळात जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. पाणी वाहून गेल्यानंतर जलवाहिनी रिकामी झाली. अखेर भरणा जलवाहिनीचा माग घेत अधिकारी- अभियंता – कर्मचऱ्यांना झोपडपट्टीत पायपीट करावी लागली. सुमारे ५१ ते ५५ मीटर दूरवर जलवाहिनाचा माग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तेथे मॅनहोल खोदले आणि जलवाहिनीत प्रवेश केला. त्यानंतर कर्मचारी जलवाहिनीतून पायपीट करीत भगदाड पडलेल्या ठिकाणी पोहोचले. दुसरा पर्यायच नसल्यामुळे जलवाहिनीची आतील बाजूने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे २८ इंच बाय २४ इंच आकाराच्या लोखंडी पत्र्याने भगदाड बुजविण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
कोल्हापूरचा अनुभव कामाला
मुसळधार पावसामुळे जलमय झालेल्या कोल्हापूरवासीयांच्या मदतीला पालिकेचे जल विभागामधील हेच कर्मचारी धावून गेले होते. कोल्हापूरकरांची तहान भागवणारे शिंगणापूर येथील मुख्य पाणीपुरवठा केंद्रही त्यावेळी पाण्याखाली गेले होते. त्यावेळी अवघ्या दोन दिवसांमध्ये शिंगणापूर पाणीपुरवठा केंद्र कार्यान्वित करण्याची किमया या कर्मचाऱ्यांनी केली. जलकामे तातडीचा दुरुस्ती विभागातील साहाय्यक अभियंता जीवन पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली होती. यावेळेस पुन्हा एकदा ४८ तास अथक मेहनत करीत वेरावली जलाशय २ व ३ ची भरणा जलवाहिनी दुरुस्ती करून वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, घाटकोपर, कुर्ला आदी परिसरातील तब्बल २० ते २२ लाख मुंबईकरांचा पाणीपुरवठा ४८ तासात सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका या पथकाने पार पाडली.