दुनिया
आसाम, त्रिपुरातून मतयज्ञाला सुरुवात
- 164 Views
- April 07, 2014
- By admin
- in दुनिया, समाचार
- 0 Comments
- Edit
सोमवार ७ एप्रिल २०१४ मुंबई : मतदानाच्या दृष्टीने आकारमानाने संपूर्ण युरोपपेक्षा मोठय़ा असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील मतयज्ञाला आज, सोमवारी प्रारंभ होत आहे. १६व्या लोकसभेसाठी होणार्या या निवडणुकीतील ८१ कोटी ४६ लाख मतदार आणि त्यातही १८ ते १९ या दोन वयोगटांतील दोन कोटी ३२ लाख नवे मतदार हे आगळे वैशिष्ट्य ठरणार आहे. गेल्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा नव्या मतदारांची संख्या १0 कोटीने जास्त आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नऊ लाख ३0 हजार मतदान केंद्रांतून होणार्या निवडणुकीत एकूण मतदारांच्या संख्येत पुरुष मतदारांचे प्रमाण ५२.४ टक्के इतके आहे, तर ४७.६ टक्के महिला मतदार आहेत. संपुआ सरकारच्या कालावधीत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रणशिंग फुंकले आहे, तर मोदी यांच्या गुजरात विकासाच्या दाव्यातील पोकळपणा आणि वेळोवेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यातून दिलेले इतिहासाचे विपर्यस्त दाखले, यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दशकभरापासून सत्तेत असलेली संयुक्त पुरोगामी आघाडी आणि त्यांच्याविरोधात शड्ड ठोकून उभे राहिलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोपाच्या तोफा जोरदार झडत असल्या तरी नव्याने जन्माला आलेले आम आदमी पार्टीसारखे पक्ष आणि प्रादेशिक पक्षांनी पणाला लावलेली स्वत:ची प्रतिमा यामुळे निवडणूक रंगतदार ठरणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)