देश
मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले
वर्धा (wardha) येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत असतांनाच विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. यावेळी महिलाही आक्रमक दिसून आल्या. 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपस्थित होते. उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री भाषण देत होते. दरम्यान प्रेक्षकांमधून अचानक महिला आणि पुरुषांनी वेगळा विदर्भ झालाच पाहीजे, शेतकरी आत्महत्या थांबल्याच पाहीजे, बेरोजगारीमुळे तरुण आत्महत्या करत आहेत. त्या तरुणांच्या आत्महत्या थांबल्याच पाहीजे अशा घोषणा देणे सुरु केले.
यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटलं की, राज्याचे मुख्यमंत्री फक्त फित कापण्यात व्यस्त आहेत. तसेच सरकार स्थापन करुन खूप मोठी कामगिरी केल्याचे दाखवत आहेत. मात्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबायला तयार नाही. मुख्यमंत्री भाषण सुरु असताना विदर्भवाद्यांनी कागदं देखील भिरकावली. यावेळी विदर्भातील शेतकरी आत्महत्याकडे देखील लक्ष वेधले गेले. यावेळी झालेल्या गोंधळात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
शिंदेसाहेब या मुद्द्यांवरही बोला: आंदोलकांचा आक्रोश
विदर्भातही शेतकरी आत्महत्या करत आहे. दुसरीकडे वेगळा विदर्भ राज्य करुन विदर्भातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा. देशासह राज्यात वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुणाई नैराश्यात जात आहे. त्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी या विषयांवर बोलण्याची गरज असताना सरकार कसं पाडलं आणि आपण मुख्यमंत्री कसे बनलो हे सांगतात, अशी टीकाही यावेळी आंदोलकांनी केली.
वर्ध्यामध्ये (Wardha) आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Marathi Sahitya Sammelan) आज पहिलाच दिवस आहे. मात्र, हा पहिलाच दिवस विदर्भवाद्यांनी घातलेल्या गोंधळामुळं चर्चेत आला आहे. मराठी साहित्य संमेलनात तिसऱ्यांदा हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आणि या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यानंतर त्यांचं भाषण सुरू असतानाच विदर्भवाद्यांनी वेगळा विदर्भच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळं सभामंडपात मोठा गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी विदर्भवादी महिलांही आक्रमक झालेल्या पहायला मिळाल्या.