जागतिक तापमानवाढीच्या झळा यंदा कोकणातील हापूस आंब्याला बसू लागल्या आहेत. त्यामुळे केवळ ३० टक्के उत्पादन हाती येण्याची शक्यता व्यापारी आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे. एपीएमसीत पाच किलोच्या पेटीला आंब्याच्या आकारानुसार पाच ते नऊ हजार रुपये इतका दर सध्या मिळत आहे.
वाशी बाजारातील (एपीएमसी) फळ घाऊक बाजारात सध्या दिवसाला ७०० पेटय़ा हापूस आंबा दाखल होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत होणारी आवक कमालीची घटल्याचा मुद्दा बागायतदारांनी उपस्थित केला. तरीही गुढीपाडव्याच्या दिवशी हापूसची आवक काही प्रमाणात वाढेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कोकणातील हापूस आंब्यांना मागील काही वर्षांत सर्वसाधारणपणे नोव्हेंबरपासून मोहर येत असल्याचे दिसून येते. त्यानंतर दोन महिन्यांनी या झाडाला फळधारणा होते, मात्र यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मार्च उजाडूनही अवघ्या दहा टक्के हापूसला मोहर आलेला नाही.
जानेवारीमध्ये हापूसची येणारी पहिली पेटी यंदा फेब्रुवारी महिन्यात दाखल झाली आहे. विविध उपाययोजना करून आंबा बागायती करणाऱ्या हापूस आंब्याचे उत्पादन गुढीपाडव्याला येण्याची शक्यता आहे. मात्र, हे उत्पादन साधारणपणे मेमध्ये मोठय़ा प्रमाणात येणार आहे.
वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी हापूस आंब्याची आवक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विधिवत पूजा करून केली जात होती. त्या वेळी हापूस आंब्याचे उत्पादन घेणारे बागायतदार जास्त नव्हते.
त्यानंतर ‘कल्टार’ हे रसायन वापरून मोठय़ा प्रमाणात हापूस आंब्याचे उत्पादन घेतले गेले. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जानेवारी महिन्यातच हापूस आंबा बाजारात आणण्याची चढाओढ बागायतदारांमध्ये लागत होती. मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे तो जुना काळ पुन्हा आला असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू होती.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.